जलसाक्षरतेचा नवा अध्याय सुरू; नेवाशात जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचा शुभारंभ
नेवासा (प्रतिनिधी): भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण असलेल्या नेवासा तालुक्यातील प्रत्येक घटकासाठी पाणी ही जीवनावश्यक गरज असून, भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी जलस्रोतांचे बळकटीकरण आणि पाण्याचा काटकसरीने वापर करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या मुळा पाटबंधारे विभाग (अहिल्यानगर) यांच्या वतीने १५ ते ३० एप्रिल दरम्यान आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा याचा शुभारंभ नेवासा पंचायत समितीच्या सभागृहात आ. लंघे यांच्या हस्ते झाला.
या कार्यक्रमास जलसाक्षरता केंद्र ‘यशदा’चे जिल्हा समन्वयक जलमित्र सुखदेव फुलारी, गटविकास अधिकारी संजय लखवाल, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुशराव काळे, तालुकाध्यक्ष प्रतापराव शिंदे, अशोकराव टेकणे, शिवसेना नेते भाऊसाहेब वाघ, सतीश कर्डिले, बाळासाहेब क्षिरसागर, जगदंबा पाणी वापर संस्थेचे सचिव शशिकुमार भोरे, उपविभागीय अभियंते अभिषेक पवार व स्वप्निल देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आ. लंघे यांनी सांगितले की, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त विशेष जलयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. २५ एप्रिल रोजी चोंडी (अहिल्यादेवींचे जन्मगाव) व त्र्यंबकेश्वर येथून यात्रांचा शुभारंभ होऊन, २६ एप्रिल रोजी ही जलयात्रा नेवासा शहरात दाखल होणार आहे. पुढे शिर्डी येथे संगम होऊन छत्रपती संभाजीनगर, घृष्णेश्वर, धुळे मार्गे इंदूर येथे २९ एप्रिल रोजी समारोप होणार आहे. या जलयात्रेद्वारे जलजागृतीसह अहिल्यादेवींच्या कार्याची ओळख जनतेला करून देण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जलमित्र सुखदेव फुलारी यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आंतरराष्ट्रीय जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांच्या संकल्पनेतून ‘यशदा’मध्ये जलसाक्षरता केंद्र स्थापन करण्यात आले असून, राज्यात जलजागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. पाण्याचा काटकसरीने वापर, जलस्रोतांचे संवर्धन, कमी पाण्यात अधिक उत्पादन, पाणी वापर संस्थांचे बळकटीकरण आणि जलव्यवस्थापनात महिलांचा वाढता सहभाग हे या उपक्रमामागील प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात उपस्थितांना जलप्रतिज्ञा देण्यात आली. प्रस्तावना स्वप्निल देशमुख यांनी मांडली, तर गणेश ढाकणे व रावण ससाणे यांनी सूत्रसंचालन केले. आभार अभिषेक पवार यांनी मानले.
चौकट : उत्कृष्ट कामगिरीचा गौरव
उस्थळ येथील वरखेड माता पाणी वापर संस्थेच्या उत्कृष्ट सिंचन व पाणीपट्टी वसुलीबद्दल कालवा निरीक्षक स्वाती साठे तसेच जगदंबा पाणी वापर संस्थेचे सचिव शशिकुमार भोरे यांचा आमदार लंघे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

