वाचनातून विचार, विचारातून संस्कार” हा संदेश देणाऱ्या सृजन कट्टा
नेवासा (प्रतिनिधी) :
नेवासा शहर व परिसरात वाचन संस्कृतीला नवी ऊर्जा देणाऱ्या आणि साहित्यप्रेमींसाठी प्रेरणास्थान ठरलेल्या ‘सृजन कट्टा’ या उपक्रमाच्या वतीने तालुकास्तरीय ‘अंतरंग पुस्तक परिचय स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार १६ ऑगस्ट व २३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत नेवासा येथील हॉटेल कृष्णा येथे ही स्पर्धा पार पडणार असून विद्यार्थी, युवक आणि वाचनप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

महेश मापारी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला सृजन कट्टा हा उपक्रम आज नेवासा परिसरातील वाचक चळवळीचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरला आहे. दर रविवारी एक वाचक आपल्या वाचलेल्या पुस्तकाचे सखोल समालोचन करून उपस्थितांसमोर त्याचा परिचय करून देतो. तसेच उपस्थितांमध्ये साहित्य, संगीत किंवा इतर कलाक्षेत्रातील गुणी व्यक्ती असतील तर त्यांनाही आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. या उपक्रमामुळे शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक, ज्येष्ठ वाचक, व्यापारी आणि साहित्यप्रेमी एका छताखाली येऊन ज्ञान, साहित्य आणि संस्कृतीचा आनंद लुटत आहेत.
स्पर्धा दोन गटांत होणार असून इयत्ता दहावीपर्यंत शालेय गट आणि इयत्ता अकरावीपासून पुढील महाविद्यालयीन गट असा विभाग करण्यात आला आहे. प्रत्येक गटासाठी प्रथम रिस्ट वॉच, द्वितीय सॅक, तृतीय पार्कर पेन सेट, तर उत्तेजनार्थ रायटिंग पॅड अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्रही प्रदान करण्यात येईल.
स्पर्धकांचे मूल्यमापन सभाधारिष्ट्य, भाषा कौशल्य व सादरीकरण, पुस्तकाशी संलग्नता, मुद्देसूद मांडणी आणि निर्माण केलेला प्रभाव या पाच निकषांवर प्रत्येकी दहा गुणांप्रमाणे एकूण ५० गुणांवर होणार आहे. प्रत्येक स्पर्धकाला पुस्तक परिचयासाठी १० मिनिटे आणि दोन मिनिटांची अतिरिक्त मुदत, असे एकूण १२ मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे.
स्पर्धेचे परीक्षण डॉ. किशोर धनवटे, राजेंद्र चौधरी, निलेश जोशी आणि डॉ. निर्मलाताई सांगळे हे करणार आहेत. नावनोंदणीसाठी डॉ. किशोर धनवटे (९८५०८६३५०९), महेश मापारी (९९६०६१३९६१), सुधीर बोरकर (९८२२८२२२६८) आणि प्रा. देविदास साळुंखे (७०४०५२७०४०) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

