बालवारकऱ्यांच्या दिंड्या आणि वकील संघाची स्वतंत्र दिंडी परिसरातील लहान लहान दिंड्या आणि परतीचे प्रवासात असलेल्या दिंड्यांनी देखील घेतले दर्शन
नेवासे (प्रतिनिधी) : आषाढी शुद्ध एकादशीच्या पावन पर्वावर ग्रंथराज ज्ञानेश्वरीची निर्मिती ज्या पवित्र स्थानी झाली, त्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पैस खांब मंदिरात दिवसभर भक्ती, श्रद्धा आणि हरिनामाचा अखंड गजर दुमदुमत राहिला. पहाटेपासूनच हजारो वारकरी, भाविक आणि दिंड्यांनी पैस खांबाचे दर्शन घेऊन माऊलींच्या चरणी कृतज्ञतेची व भक्तीची वंदना अर्पण केली.

पहाटे चार ते पाच या मंगलवेळेत विनोद नळकांडे व सुवर्णा नळकांडे तसेच अनंता नळकांडे, सविता नळकांडे आणि सत्वशीला दिगंबर नळकांडे यांच्या हस्ते विधिवत महापूजा व आरती संपन्न झाली. आरतीच्या वेळी मंदिर परिसरात “ज्ञानोबा-तुकाराम” आणि “माऊली माऊली”च्या जयघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले. माऊली सेवेकरी आशिष कावरे, विष्णू जाधव, गोरख भरात, बाजीराव शेळके व विद्यार्थी सेवेकऱ्यांनी आरती आणि पसायदानात उत्स्फूर्त सहभाग घेतला. यजमान नळकांडे कुटुंबाचा मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सायंकाळी सौ पूजा व अथर्व वडापूरकर यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दिवसभर दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांचे मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, विश्वस्त ह.भ.प. देविदास महाराज म्हस्के, कैलास जाधव, रामभाऊ जगताप, कृष्णाभाऊ पिसोटे, विश्वास मामा गडाख, माऊली शिंदे, भगवानराव सोनवणे, जनसंपर्क अधिकारी भैय्या कावरे यांच्यासह सेवेकऱ्यांनी स्वागत केले.
भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी मंदिर व्यवस्थापन समितीने दर्शनबारीची उत्कृष्ट व्यवस्था केली होती. सेवेकऱ्यांनी शिस्तबद्ध रांगांचे नियोजन करत भाविकांना शांततेत दर्शन घडविले. मंदिर परिसरात वारकऱ्यांसाठी केळी, साबुदाणा खिचडी आदी फराळाचे वाटप करण्यात आले.
आषाढी वारीसाठी तालुक्यातील शंभरहून अधिक दिंड्या पंढरपूरकडे रवाना झाल्या असल्या तरी अनेक छोट्या-मोठ्या दिंड्यांनी नेवासे येथे येऊन पैस खांबाचे दर्शन घेतले.
बालवारकऱ्यांच्या दिंड्या आणि वकील संघाची स्वतंत्र दिंडी विशेष आकर्षण ठरली. विदर्भ व मराठवाड्यातील अनेक दिंड्यांनी पंढरपूरहून परतीच्या प्रवासातही नेवासे येथे थांबून माऊलींचे दर्शन घेतल्याने मंदिर परिसर दिवसभर वारकरी संप्रदायाच्या भक्तिरसाने न्हाऊन निघाला.
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. तसेच एकादशीनिमित्त शहरात केळी, रताळी, बटाटे, आंबे यांसारख्या फराळाच्या पदार्थांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. संत तुकाराम महाराज मंदिर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि श्री मोहिनीराज मंदिरातही दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली.
चौकट : परतीच्या वारीतही पैस खांबाचे दर्शन
पंढरपूरहून आपल्या गावी परतणाऱ्या विदर्भ, मराठवाडा व राज्यातील विविध भागांतील अनेक दिंड्यांनी नेवासे येथे थांबून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पावन पैस खांबाचे दर्शन घेतले. “ज्ञानेश्वरी”च्या रचनास्थानाचे दर्शन घेतल्याशिवाय वारी पूर्ण होत नाही, अशी भावना व्यक्त करत वारकऱ्यांनी माऊलींच्या चरणी कृतज्ञतेची वंदना अर्पण केली.

