spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedबेलपिंपळगाव गावच्या श्री रोकडोबा हनुमान मंदिराची भव्य यात्रा यंदा पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी...

बेलपिंपळगाव गावच्या श्री रोकडोबा हनुमान मंदिराची भव्य यात्रा यंदा पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी …..

रोकडोबा हनुमान रोकडा व्यवहार आहे ….उधार काही ठेवत नाही. जो जो जैसा भावे त्याशी तैसा पावे…..



नेवासा

: नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथील जागरूक देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री रोकडोबा हनुमान मंदिराची सालाबादप्रमाणे भरणारी भव्य यात्रा यंदा पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी होणार आहे. या यात्रेचे अध्यक्षपद व संपूर्ण नियोजनाची जबाबदारी यंदा ग्रामस्थांनी वर्षभर धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या गंगाजल मित्रमंडळ, नेवासा यांच्याकडे सोपविली आहे.


श्री रोकडोबा हनुमान हे नवसाला पावणारे जागृत देवस्थान म्हणून पंचक्रोशीतच नव्हे, तर देशभरातील भाविकांमध्ये श्रद्धास्थान आहे. यात्रेनिमित्त दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. श्रावण महिनाभर मंदिराच्या गाभाऱ्यात शेकडो दिवे अहोरात्र प्रज्वलित ठेवले जातात. दीप अमावास्येपासून या धार्मिक उत्सवाला सुरुवात होते.


ज्या भाविकांनी रोकडोबा हनुमानाला नवस केला आणि त्यांची मनोकामना पूर्ण झाली, असे भाविक श्रद्धेने महिनाभर मंदिरात दिवे प्रज्वलित करतात. भाविकांकडून दिवा मंदिरात आणून दिला जातो. एका दिव्यासाठी ५०० रुपयांची पावती केली जाते. देवस्थानचे सेवेकरी अहोरात्र तेल घालून हे दिवे प्रज्वलित ठेवतात. त्यामुळे श्रावण महिन्यात संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने उजळून निघतो.


गंगाजल मित्रमंडळाची वर्षभर भक्तीसेवा
यंदाच्या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे गंगाजल मित्रमंडळातील शेकडो तरुणांनी वर्षभर केलेली धार्मिक व सामाजिक सेवा. मंडळाच्या वतीने वर्षभर हनुमान चालीसा पाठ, दर शनिवारी खिचडी प्रसादाचे वाटप, आरती तसेच मंदिर परिसराची स्वच्छता असे विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्यामुळे यात्रेच्या नियोजनाची जबाबदारी या तरुण मंडळाकडे देण्याचा आगळावेगळा पायंडा यंदा पडला आहे.


गंगाजल मित्रमंडळाचे कार्यकर्ते घोगरगाव येथील गंगा-गोदावरी संगमातून दररोज गंगाजल आणून मारुतीरायाला जलाभिषेक करतात. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथूनही शेकडो भाविक गंगाजल आणतात. काशी, गया आदी तीर्थक्षेत्रांहूनही भाविक गंगाजल घेऊन येऊन रोकडोबा हनुमानाचा अभिषेक करतात.


करीच्या यात्रेच्या दिवशी भाविकांना गूळ, पेढे व शेरणीचा प्रसाद वाटला जातो. अनेक भाविक नवस फेडण्यासाठी शेरणी अर्पण करतात. गावच्या लेकी-बाळी, माहेरवाशिणी आणि पंचक्रोशीतील भाविक या यात्रेसाठी आवर्जून येतात. यात्रेच्या दिवशी गावात जणू दीपावलीचा उत्सव साजरा होत असल्याचे चित्र पाहायला मिळते.


गंगा-गोदावरीतून आलेल्या मूर्तीचा इतिहास
श्री रोकडोबा हनुमान मंदिराला शेकडो वर्षांचा इतिहास असल्याची आख्यायिका सांगितली जाते. गंगा-गोदावरीच्या प्रवाहातून ही हनुमानाची मूर्ती पाण्यात वाहत आली होती. ही मूर्ती जैनपूर येथील डोहात अखंड अवस्थेत असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर ती बैलगाडीतून आणली जात असताना बेलपांढरी येथे बैलगाडीचे चाक चुरले आणि मूर्तीचा एक तुकडा तेथे पडला. त्या ठिकाणी त्या भागाची विधिवत स्थापना करण्यात आली. ते स्थान पुढे म्हसोबा देवस्थान म्हणून प्रसिद्ध झाले.
त्यानंतर मूर्ती गावाकडे आणताना जुने बाजारतळ येथे पुन्हा बैलगाडीचे चाक चुरले आणि मूर्तीचे आणखी दोन तुकडे झाले. त्यातील एक भाग तेथे विधिवत स्थापन करण्यात आला. हे स्थान पुढे वेताळबाबा म्हणून प्रसिद्ध झाले. गावाच्या वेशीबाहेर पुन्हा बैलगाडीचे चाक चुरल्यानंतर त्या ठिकाणी मूर्तीची स्थापना करण्यात आली आणि तेथेच आजचे श्री रोकडोबा हनुमान मंदिर उभे8 राहिले, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे.
नवसाला पावणारा रोकडोबा हनुमान
रोकडोबा हनुमानाच्या जागृत देवस्थानाबाबत अनेक भाविकांच्या श्रद्धेच्या कथा सांगितल्या जातात. डोळ्यांचा त्रास असलेल्या भाविकांनी नवस केल्यानंतर लाभ झाल्याच्या, ऐकू न येणाऱ्या व्यक्तींना ऐकू येऊ लागल्याच्या, बोलता न येणाऱ्यांना बोलता आल्याच्या तसेच अपंगत्वातून लाभ झाल्याच्या अनेक भाविकांच्या श्रद्धा आहेत. अपत्यप्राप्तीसाठी नवस करणाऱ्या दाम्पत्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्याचीही भाविकांमध्ये श्रद्धा आहे. त्यामुळे या जागृत देवस्थानावरील भाविकांची श्रद्धा दिवसेंदिवस वाढत आहे.
महाबली हनुमान, महावीर, रामदूत, अंजनीपुत्र, शंकरसुवन, विक्रम बजरंगी, पवनतनय, मारुती आणि रोकडोबा हनुमान अशा विविध नावांनी मारुतीरायाची भक्तिभावाने उपासना केली जाते.


श्री रोकडोबा हनुमान मंदिर हे नेवासा-श्रीरामपूर राज्य मार्गालगत नेवासा शहरापासून सुमारे १४ किलोमीटर अंतरावर आहे. गंगा-गोदावरी, घोगरगाव येथून सुमारे तीन किलोमीटर तर पाचेगाव-प्रवरा नदीपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर बेलपिंपळगाव हे स्वच्छ, सुंदर व हिरव्यागार बागायती क्षेत्राने समृद्ध गाव आहे.
यंदाच्या यात्रेचे नियोजन गंगाजल मित्रमंडळाकडे सोपविण्यात आल्याने तरुणाईच्या सहभागातून यात्रा अधिक शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे. पंचक्रोशीसह देशभरातील भाविकांनी या धार्मिक पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री हनुमान देवस्थान यात्रा कमिटी, बेलपिंपळगाव ग्रामस्थ आणि गंगाजल मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
light rain
29.6 ° C
29.6 °
29.6 °
70 %
6.1kmh
88 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
30 °
Sat
29 °

Most Popular

error: Content is protected !!