थोर समाजसेवक, विवेकवादी विचारवंत आणि अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या २० ऑगस्ट शहीद दिनानिमित्त विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली!
आपल्या देशात सामाजिक सुधारणा व्हाव्यात, समाजातील वाईट रूढी-परंपरा नष्ट व्हाव्यात आणि विवेकवादी, विज्ञाननिष्ठ समाज निर्माण व्हावा, यासाठी संत-महंतांसह अनेक थोर सIमाजसुधारकांनी समाजप्रबोधनाचे कार्य केले. लोकशिक्षणाच्या माध्यमातून जनजागृती केली. मात्र आजच्या आधुनिक युगातही भानामती, भोंदूगिरी, बुवाबाजी, जादूटोणा आणि विविध अंधश्रद्धांचे राक्षसी स्वरूप अनेक ठिकाणी पाहायला मिळते. नाशिक जिल्ह्यातील भोंदूबाबा खरात प्रकरणासारख्या घटना या वास्तवाची जाणीव करून देतात. त्यामुळे विवेकवादी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा विचार आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आजच्या युवकांच्या खांद्यावर अधिक मोठी आहे.
डॉ. नरेंद्र दाभोळकर हे केवळ अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यकर्ते नव्हते, तर ते उत्तम क्रीडापटू, डॉक्टर, लेखक, संपादक आणि समाजप्रबोधक होते. राष्ट्रीय स्तरावरील कबड्डीपटू असलेल्या डॉ. दाभोळकरांनी १९७० मध्ये वैद्यकीय पदवी संपादन केल्यानंतर सुमारे बारा वर्षे आरोग्य क्षेत्रात सेवा केली. मात्र समाजसेवेची व्यापक गरज लक्षात घेऊन १९८२ पासून त्यांनी अंधश्रद्धा, बुवाबाजी आणि भोंदूगिरीविरोधात कार्य सुरू केले आणि पुढे आपले संपूर्ण जीवन या कार्याला वाहून घेतले.
शासनाचे कोणतेही अनुदान न घेता त्यांनी १९८९ मध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली. महाराष्ट्रभर समितीच्या शाखा उभारून त्यांनी विवेकवादी विचारांची चळवळ गावागावांत पोहोचवली. अंगात येणे, जादूटोणा, भूत-पिशाच्च, चमत्कार आणि विविध अंधश्रद्धांविरोधात त्यांनी जनजागृती केली. अंधश्रद्धेविरोधातील या लढ्याला त्यांनी विज्ञाननिष्ठ विचारांची आणि कृतीची जोड दिली.
देव आणि धर्माला डॉ. दाभोळकरांचा विरोध नव्हता; मात्र धर्माच्या नावाखाली होणारी धर्मांधता, शोषण आणि अंधश्रद्धेला त्यांचा ठाम विरोध होता. विवेकवाद, प्रमाणवाद, विज्ञाननिष्ठा आणि चिकित्सक विचारसरणी यांचा पुरस्कार करत त्यांनी समाजाला प्रश्न विचारण्याची आणि सत्याची चिकित्सा करण्याची प्रेरणा दिली.
स्वर्गीय साने गुरुजी यांनी सुरू केलेल्या ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे समाजप्रबोधनाचे प्रभावी कार्य केले. विविध सामाजिक प्रश्नांचा सखोल अभ्यास करून त्यांनी लेखन केले. अंधश्रद्धा आणि सामाजिक रूढींवर प्रहार करणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा व्हावा यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे आणि जनजागृतीमुळे महाराष्ट्रात हजारो कार्यकर्ते विवेकवादी चळवळीशी जोडले गेले.
२० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात सकाळच्या फेरफटक्यासाठी गेले असताना डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची दुर्दैवी हत्या करण्यात आली. व्यक्तीला संपवता येते; मात्र विचारांना संपवता येत नाही, हे त्यांच्या हौतात्म्यानंतर पुन्हा एकदा सिद्ध झाले. त्यांच्या हत्येनंतर २०१३ मध्ये महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायद्याच्या दिशेने महत्त्वाची प्रक्रिया पुढे सरकली आणि कायदा अस्तित्वात आला.
आजही समाजात अंधश्रद्धा, भोंदूगिरी आणि बुवाबाजीचे विविध प्रकार सुरू आहेत. त्यामुळे डॉ. दाभोळकरांचा विवेकवादी, विज्ञाननिष्ठ आणि मानवतावादी विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

