‘
नेवासा : अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या ज्ञानोदय इंग्लिश स्कूल, नेवासा येथील प्राचार्य रावसाहेब चौधरी यांची नेवासा तालुका मुख्याध्यापक संघाच्या सचिवपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
सोमवार, दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी नेवासा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी रामनाथ कराड यांच्या अध्यक्षतेखाली त्रिमूर्ती विद्यालय, नेवासा फाटा येथे विविध शैक्षणिक प्रश्नांवर मुख्याध्यापकांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस नेवासा तालुक्यातील विविध विद्यालयांचे मुख्याध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते.
सभेत विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक व विद्यालयांशी संबंधित विविध प्रश्न तसेच शासकीय योजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर नेवासा तालुका मुख्याध्यापक संघाच्या कार्यकारिणीतील बदलाबाबत साधक-बाधक चर्चा झाली. संघाचे सचिव मुख्याध्यापक रामलाल कर्डिले यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदावर प्राचार्य रावसाहेब चौधरी यांच्या शिक्षक संघटनेतील योगदानाची दखल घेत त्यांची सचिवपदी निवड करण्यात आली.
नेवासा तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य सोपानराव काळे यांनी कार्यकारिणी बदलाबाबत सूचना मांडली. या सूचनेस उद्धवराव सोनवणे यांनी अनुमोदन दिले. उपस्थित सर्व मुख्याध्यापकांनी टाळ्यांच्या कडकडाटात चौधरी यांच्या निवडीचे स्वागत केले.
गटशिक्षणाधिकारी रामनाथ कराड यांच्या हस्ते नवनिर्वाचित सचिव प्राचार्य रावसाहेब चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विस्ताराधिकारी भागिनाथ बडे, बाळासाहेब मोटे, प्राचार्य सोपानराव काळे, बाळासाहेब पंडित, उद्धवराव सोनवणे, राजेंद्र लोहकरे, राजेंद्र शेंडे, अशोक शेंडगे, सावता गायकवाड, रमेश खाटीक, शमी सर यांच्यासह नेवासा तालुका मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी व तालुक्यातील मुख्याध्यापक उपस्थित होते.
प्राचार्य रावसाहेब चौधरी यांच्या निवडीबद्दल शिक्षण क्षेत्रातून व विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

