spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedविकास कसला? शहराची पंचवीस वर्षांची पिछेहाट : एक अस्वस्थ करणारे चिंतन

विकास कसला? शहराची पंचवीस वर्षांची पिछेहाट : एक अस्वस्थ करणारे चिंतन




शेवगाव :प्रा. जनार्दन लांडे पाटील

शेवगाव तालुका महाराष्ट्रात नव्हे तर भारताच्या ज्वारीचे कोठार
दुष्काळी पट्ट्यात मोडणारा, पण दक्षिण गंगा गोदावरीच्या कृपाछायेत न्हालेला हा प्रदेश कधीकाळी समृद्धीचा श्वास घेत होता. “एकदा पेरलं की काढणीलाच जायचं” अशी जमीन, अंगणात भुसार मालाने भरलेली बळदं, खळवाडीत सुबत्तेचा गंध आणि माणसांच्या चेहऱ्यावर समाधानाचे तेज दिसायचे. खळी आटोपली की लोक देवदर्शनाला, पाहुणचाराला, नात्यांच्या ऊबेला वेळ देत. साधेपणातही आनंद नांदत होता.


मात्र स्वातंत्र्योत्तर काळात बदलांचे वादळ वाहू लागले. १९६५ मध्ये पैठण येथे आशिया खंडातील भव्य जायकवाडी धरणाचे काम सुरू झाले आणि १९७६ ला पूर्णत्वास गेले. या धरणासाठी तालुक्यातील १९ गावे व सुमारे सात हजार हेक्टर सुपीक काळी जमीन जलसमाधीला गेली. विकासाच्या नावाखाली भूमिपुत्रांचे संसार पाण्याखाली गेले.


त्या वेळी दूरदृष्टी असलेले नेते मारुतराव घुले पाटील पुढे सरसावले. त्यांनी शेतीबरोबर शिक्षण आणि उद्योगाचा मार्ग खुला केला. पद्मभूषण बाळासाहेब भारदे विद्यालय, रेसिडेन्शियल हायस्कूल, आबासाहेब काकडे विद्यालय अशा संस्था उभ्या राहिल्या. १९६९ मध्ये आयटीआय सुरू करून कौशल्याधारित शिक्षणाला बळ दिले. पुढे वैद्यकीय शिक्षण, पब्लिक स्कूल, सैनिकी शिक्षण, तांत्रिक शिक्षण संकुले यामुळे शेवगाव ज्ञाननगरीकडे वाटचाल करू लागले.
शेतकऱ्यांना पाणीउचल परवानग्या, पाइपलाइनसाठी सहकारी बँकांतून कर्ज, सिंचनाची जोड मिळाली आणि परिसर हिरवागार झाला. बागायती वाढल्या. रस्ते, बँका, बाजारपेठा फुलल्या. धरणग्रस्त विस्थापितांनी शेवगावला निवासस्थान मानले. “विस्थापितांचे शहर” अशी नव्याने ओळख तयार झाली.


हळूहळू नगदी पिकांचे दिवस आले. ऊसशेती वाढली. ज्ञानेश्वर आणि केदारेश्वर सहकारी साखर कारखान्यांनी गती दिली. उच्च प्रतीचा कापूस गुजरातपर्यंत जाऊ लागला. १४ जिनिंग-प्रेसिंग कारखाने, १२ तेल गिरण्या, तेल प्रक्रिया उद्योग उभे राहिले. गंगामाई खासगी साखर कारखान्याने औद्योगिक वैभवाला नवा मुकुट चढवला. रोजगार वाढला. शेवगाव भरभराटीच्या शिखरावर पोहोचले.


परंतु समृद्धीला दृष्ट लागली. उद्योग एकामागून एक कोमेजू लागले. काही कारखाने स्थलांतरित झाले, काही कुलूपबंद झाले. आज उरलेल्या मोजक्याच गिरण्या जीव मुठीत धरून तग धरत आहेत.
२०१५ मध्ये ग्रामपंचायतीची नगरपरिषद झाली; पण बदलाची पहाट उगवलीच नाही. नगरपरिषद आली, मात्र नगरविकास हरवला. कोट्यवधींचा निधी मिळूनही नळाला चौदा-पंधरा दिवसांनी पाणी येते, ही शोकांतिका आहे. निवडणुकीपूर्वी पाण्यासाठी घोषणांचा पाऊस पाडणारे सत्तेत गेल्यावर मौनव्रत धारण करून बसले. विरोधकही दिशाहीन झाले.


दरम्यान २०१९-२० मध्ये शेअर मार्केटिंगच्या नावाने लालसेचा महापूर आला. १२ ते १८ टक्के मासिक परताव्याच्या आमिषाने लोकांना जाळ्यात ओढले गेले. टोप्या घालणारे तथाकथित ‘बिझनेस गुरु’ रातोरात उभे राहिले. कीर्तनकार, संत-महंत, एजंट, प्रचारक यांच्या माध्यमातून हजारो कोटींची उकळपट्टी झाली. लोकांनी शेती विकली, घरे गहाण ठेवली, कर्जे काढली, आयुष्याची पुंजी ओतली. आणि एका दिवसात सर्व काही हवेत विरले. संसार उद्ध्वस्त झाले, अनेकांनी नैराश्यातून जीवन संपवले.


२०२३ अखेरपासून गुन्हे दाखल होऊ लागले. ६५ पेक्षा अधिक चालकांवर हजारो कोटींचे दावे दाखल झाले. ४३ जण तुरुंगात गेले; अनेक फरार आहेत. श्रद्धेच्या नावावर झालेली ही लूट शेवगावच्या कपाळावरचा काळा डाग ठरली.


याच काळात अतिक्रमण हटाव मोहिमेने शहराला आणखी जखमी केले. नोटिसा देऊन हजारो अतिक्रमणे हटवली गेली. जेसीबीच्या दातांनी भिंती फोडल्या, स्लॅब मोडले, दुकाने जमीनदोस्त झाली. पण त्यानंतरचा राडारोडा आजही तसाच उभा आहे. तुटलेल्या भिंती अजूनही शहराच्या जखमा मोजत आहेत. हजारो छोट्या व्यावसायिकांचा उदरनिर्वाह संपला. त्यांच्या कुटुंबांची चूल विझली. काहींनी आत्महत्येचा मार्ग निवडला.


एकेकाळची गजबजलेली बाजारपेठ आज ओसाड दिसते. गती हरवलेले रस्ते, निराशेने भरलेले चेहरे आणि विकासाच्या नावाखाली उरलेले भग्न अवशेष एवढेच चित्र दिसते.


म्हणूनच प्रश्न उपस्थित होतो — हा विकास आहे की विनाश?
शेवगाव पुढे गेले नाही; उलट पंचवीस वर्षे मागे फेकले गेले, असे म्हणणे आज अतिशयोक्ती राहिलेले नाही.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
few clouds
32.2 ° C
32.2 °
32.2 °
18 %
2.9kmh
20 %
Sun
44 °
Mon
45 °
Tue
43 °
Wed
42 °
Thu
41 °

Most Popular

error: Content is protected !!