spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedतेलकुडगावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तातडीने बसवा; अन्यथा राज्यभर आंदोलनाचा इशारा...

तेलकुडगावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तातडीने बसवा; अन्यथा राज्यभर आंदोलनाचा इशारा…

पुतळा हटविण्यामागील नेमके कारण काय? प्रशासनाने दिलेले आश्वासन अद्याप का पाळले नाही



नेवासा : तालुक्यातील तेलकुडगाव येथे आंबेडकरी अनुयायांनी सार्वजनिक जागेत बसविलेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा प्रशासनाने रातोरात हटविल्याचा गंभीर आरोप करत, तो पुतळा त्याच ठिकाणी तातडीने पुन्हा बसवावा, अन्यथा नेवासा तालुक्यासह अहमदनगर जिल्हा आणि संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा आक्रमक इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे.
यासंदर्भात मंगळवारी (दि. १८ ऑगस्ट) वंचित बहुजन आघाडी, नेवासा तालुक्याच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या निवेदनातून प्रशासनाच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.


आंबेडकरी अनुयायांनी सुमारे चार-पाच महिन्यांपूर्वी तेलकुडगावातील सार्वजनिक जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याची स्थापना करून मानवंदना दिली होती. मात्र, त्यानंतर अवघ्या चार-पाच दिवसांत रात्रीच्या वेळी प्रशासनाने हा पुतळा हटवून गायब केला, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.


पुतळा हटविल्यानंतर गावातील तसेच तालुक्यातील आंबेडकरी अनुयायांनी जिल्हा पोलीस प्रशासनाशी चर्चा केली होती. त्यावेळी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी परवानगी घेऊन पुतळा पुन्हा बसवून देण्याचे आश्वासन दिले होते, असा दावा वंचित बहुजन आघाडीने केला आहे. मात्र, अनेक महिने उलटूनही पुतळा पुन्हा बसविण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाचे काय झाले, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला आहे.


दरम्यान, न्याय मिळावा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पुन्हा त्याच ठिकाणी बसविण्यात यावा, या मागणीसाठी तेलकुडगावातील नागरिकांनी दि. १५ ऑगस्टपासून अमरण उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र, अद्यापही प्रश्न मार्गी लागला नसल्याने आंबेडकरी अनुयायांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.


“प्रशासनाने आता वेळकाढूपणा न करता तातडीने पुतळा बसविण्याची कार्यवाही करावी. अन्यथा हा प्रश्न केवळ तेलकुडगावापुरता मर्यादित राहणार नाही. नेवासा तालुका, अहमदनगर जिल्हा आणि राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल,” असा स्पष्ट इशारा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला.


यावेळी तालुका महासचिव गणपतराव मोरे, दीपक सरोदे, आकाश इंगळे, योगेश गायकवाड, नितीन गोर्डे, राम मगरे, उत्तम बोर्डे, किशोर गोरे, रामनाथ नाचन, जावेद शेख, बहादूरखा पठाण, दगडू खर्चन आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


पुतळा हटविण्यामागील नेमके कारण काय? प्रशासनाने दिलेले आश्वासन अद्याप का पाळले नाही? या प्रश्नांमुळे आता तेलकुडगावातील वातावरण तापले असून, प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे आंबेडकरी अनुयायांचे लक्ष लागले आहे.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
overcast clouds
25.1 ° C
25.1 °
25.1 °
81 %
4kmh
100 %
Wed
31 °
Thu
30 °
Fri
30 °
Sat
29 °
Sun
30 °

Most Popular

error: Content is protected !!