सलग दोन वर्ष पाणी देऊन दीडशे झाडांचे केले संवर्धन….
दीडशे झाडांचे
नेवासा (प्रतिनिधी)
: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नेवासा येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या मॉर्निंग वॉक अमरनाथ ग्रुपच्या वतीने देवगड रस्त्यावर लावलेल्या शेकडो वृक्षांना टँकरद्वारे पाणी देऊन जलाभिषेक करण्यात आला. अमरनाथ ग्रुपचे प्रमुख नंदकुमार पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला
.
दोन वर्षांपूर्वी खडका रस्त्यावरील देवगडकडे जाणाऱ्या मार्गावर अमरनाथ ग्रुपच्या वतीने सुमारे १५० विविध प्रजातींची वृक्ष लागवड करण्यात आली होती. कडक उन्हाळ्यातही या वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्याचे कार्य सातत्याने करण्यात येत असून, पर्यावरण दिनानिमित्त आज विशेष उपक्रमांतर्गत त्यां झाडांना टँकरद्वारे पाणी देऊन संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
या उपक्रमात नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा अमरनाथ ग्रुपचे मार्गदर्शक नंदकुमार पाटील, वृक्ष संवर्धन समितीचे व्यवस्थापक रामनाथ जाधव, रविंद्र जोशी, मेजर अरुण धनक, दिलीप जगदाळे, युनायटेड इन्शुरन्स कंपनीचे विकास अधिकारी किशोर गारुळे, व्यापारी शशिकांत नळकांडे, माजी नगरसेवक अंबादास ईरले, शंभूराजे जंगले, पत्रकार सुधीर चव्हाण, नगरसेवक जालिंदर गवळी, इंजिनिअर शंकर ओहोळ, व्यापारी राजेंद्र महाजन, मूर्तिकार बजरंग ईरले, ज्ञानेश्वर उगले, बँक व्यवस्थापक चंद्रकांत काटे व सुरेश शिंदे यांनी सहभाग नोंदवला.
अमरनाथ ग्रुपने वृक्ष संवर्धनाबरोबरच गोशाळेला शेड उभारणी, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, स्वच्छता अभियान आदी समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले आहेत. तसेच जळीतग्रस्त व्यावसायिकांना आर्थिक मदत करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले.

