कोणत्याही परिस्थितीत विकासकामे थांबू देणार नाही,असा निर्धार….
नेवासा,
: नेवासा नगरपंचायतीच्या कामकाजात विरोधी नगरसेवकांकडून सातत्याने अडथळे आणले जात असून, प्रत्येक बैठकीत पूर्वग्रहदूषित भूमिका घेत सदस्य बाहेरील व्यक्तींच्या सूचनांवर मोबाईलवर येणाऱ्या आदेशाने विकासकामांना विरोध केला जात आहे, असा आरोप नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांनी पत्रकार परिषदेत केला.
नागरिकांनी दिलेल्या विश्वासाच्या बळावर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, कोणत्याही परिस्थितीत विकासकामे थांबू देणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
डॉ. घुले म्हणाले की, जानेवारी २०२६ पासून नगरपंचायतीच्या कारभाराची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, भूमिगत गटार, रस्ते आदी मूलभूत सुविधांशी संबंधित कामांना गती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, विरोधी सदस्य प्रत्येक विषयावर नकारात्मक भूमिका घेत असून, हे सदस्य बाहेरील व्यक्तींच्या सूचनांवर काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
प्रशासकीय कामकाजातही अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आले असून, सभेचे इतिवृत्त वेळेत तयार न होणे, अजेंडा व टिपणे अपूर्ण राहणे, जबाबदारी टाळण्याची प्रवृत्ती यामुळे विकासकामांवर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याच्या नियोजनातही विरोधी भूमिकेमुळे अडचणी निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला. ३ जुलैच्या सभेत आवश्यक ठराव वेळेत मंजूर न झाल्याने पालखीच्या पहिल्या मुक्कामाच्या नियोजनावर परिणाम झाला आणि वारकऱ्यांना गैरसोय सहन करावी लागली, ही बाब दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले.
सभेपुढे ठेवण्यात आलेले नवीन पाणीपुरवठा योजना, भूमिगत गटार, एसटीपी प्रकल्प, डीपी प्लॅन तसेच तातडीच्या रस्ते, गटारी व पाणीवाहिन्यांच्या दुरुस्तीच्या कामांना मंजुरी देण्याचे प्रस्तावही विरोधकांनी नाकारल्याचा आरोप करत, पाण्याची टाकी, कोंडवाडा आणि धार्मिक स्थळांशी संबंधित कामांनाही विरोध करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
नगराध्यक्षांनी स्पष्ट केले की, नगरपंचायतीत अडथळे निर्माण झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) यांसारख्या सक्षम यंत्रणांच्या माध्यमातून विकासकामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. शहराचा विकास कोणत्याही परिस्थितीत थांबू दिला जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
सभेपूर्वी सोशल मीडियावर अजेंड्याबाबत भाष्य करून सभेच्या प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत, याबाबत कायदेशीर सल्ला घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे हक्कभंगासह आवश्यक कारवाईची मागणी करणारे निवेदन देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. संपूर्ण सभेचे ध्वनिचित्रित रेकॉर्डिंग उपलब्ध असून, पत्रकारांनी मागणी केल्यास ते उपलब्ध करून दिले जाईल, असेही त्यांनी सांगितल
या पत्रकार परिषदेत सत्ताधारी गटनेते लोखंडे यांच्यासह सर्व सत्ताधारी नगरसेवक आणि नगरसेविकाउपस्थित होते

