नगराध्यक्ष घुले यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांना उत्तरे देण्यासाठी काढले प्रसिद्धी पत्रक…..
नेवासा : प्रतिनिधी
नेवासा नगरपंचायतीतील विकासकामांना विरोध केल्याचा आरोप वस्तुस्थितीला धरून नसून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप उपनगराध्यक्ष शालिनी सुखधान यांनी केला आहे. ज्या विषयांवर विरोध केल्याचा दावा केला जात आहे, त्याच विषयांशी संबंधित ठराव २० एप्रिल २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत बहुमताने मंजूर करण्यात आले होते. त्यामुळे विकासाला विरोध असल्याचा आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सुखधान यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगरपंचायतीच्या विकासासाठी विरोधी गटाने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. दोन महिन्यांपूर्वी सर्व १७ नगरसेवकांची बैठक घेऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवण्याचा निर्णय झाला होता. विरोधी गटाकडे संख्याबळ अधिक असूनही शहरहिताला प्राधान्य देत विकासनिधीचे समसमान वाटप करण्यास सहमती दर्शविण्यात आली होती. त्यानुसार विविध प्रभागांतील कामांचे प्रस्ताव नगराध्यक्षांकडे सादर करण्यात आले होते.
मात्र, त्यानंतरच्या सभेच्या अजेंड्यात विरोधी गटाने सुचविलेल्या एकाही विकासकामाचा समावेश करण्यात आला नसल्याचा आरोप त्यांनी केला. शिवाय अजेंड्यासोबत कोणत्या प्रभागात कोणते काम होणार, त्यासाठी किती निधी लागणार, तांत्रिक व प्रशासकीय मंजुरीची स्थिती काय आहे किंवा मुख्याधिकाऱ्यांचे अभिप्राय काय आहेत, याबाबत कोणतीही माहिती जोडण्यात आली नव्हती. केवळ सर्वसाधारण स्वरूपाचे विषय ठेवून मंजुरी घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने त्यास हरकत घेण्यात आली, असे त्यांनी सांगितले.
या संदर्भात २४ जून रोजी लेखी आक्षेप नोंदविण्यात आला होता. त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी आवश्यक टिपण्या उपलब्ध नसल्याचे लेखी कळविले होते. तरीही अपूर्ण माहितीच्या आधारे तोच विषय पुढील सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आल्याने नियमांचे पालन व्हावे, एवढीच आमची भूमिका होती, असे सुखधान यांनी स्पष्ट केले.
आपल्या भूमिकेला आधार देण्यासाठी त्यांनी १५ जूनचे विकासकामांचे प्रस्ताव, २३ जूनचा सभेचा अजेंडा, २४ जूनची लेखी हरकत, मुख्याधिकाऱ्यांकडे केलेला पत्रव्यवहार तसेच आवश्यक टिपण्या उपलब्ध नसल्याची लेखी नोंद अशी अधिकृत कागदपत्रे प्रसिद्धीपत्रकासोबत जोडली आहेत

