तब्बल ६० विद्यार्थी आतापर्यंत विविध प्रशासकीय सेवेत रुजू झाले भागातील इतर विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाचा लाभ घ्यवा-समन्वयक महेश मापारी
नेवासा :
यशवंत स्टडी क्लब, नेवासा येथील विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीत उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल त्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. यामध्ये चिंधे प्रद्युमन (PSI – पोलीस उपनिरीक्षक), वाघमारे दिग्विजय, वाखूरे विजय, भांड सुदर्शन, तागड मयूर यांची पोलीस पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधत उद्योजक शिवा भाऊ पाठक यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सृजन कट्टा’ या उपक्रमासाठी ११ हजार रुपयांच्या पुस्तकांची भेट अभिजित अष्टेकर यांनी स्टडी क्लबला दिली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अधिक सक्षम साधनसामग्री उपलब्ध होणार आहे.
कार्यक्रमास नंदकुमार पाटील, डॉ. शंकर शिंदे, बाळासाहेब पवार, महेश भाऊ मापारी, अभिजित अष्टेकर, भैय्या कावरे, प्रा. देविदास साळुंके, ॲड. गोरे भाऊसाहेब, राहुल सानप, जयदीप जामदार, सौरभ मुनोत, बाळासाहेब नगरे यांसह स्टडी क्लबचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांनीही आपल्या यशाचा प्रवास कथन करत जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण मेहनतीचे महत्त्व अधोरेखित केले. ग्रामीण भागात जन्म असूनही कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाच्या जोरावर यशाची शिखरे गाठता येतात, हे या विद्यार्थ्यांनी सिद्ध करून दाखवले असून त्यांचा प्रवास इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली निंबाळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. देविदास साळुंके यांनी केले.
चौकट :
यशवंत स्टडी क्लब, नेवासा येथील तब्बल ६० विद्यार्थी आतापर्यंत विविध प्रशासकीय सेवेत रुजू झाले असून ही बाब अभिमानास्पद आहे. ग्रामीण भागातील इतर विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समन्वयक महेश मापारी यांनी केले.

