नेवासा
: नेवासा तालुक्यातील गोंडेगाव येथील जनकल्याण फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कवी संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
भेंडा बुद्रुक येथील नागेबाबा मार्ट येथे ३० एप्रिल २०२६ रोजी कवी संमेलनानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री व सुप्रसिद्ध साहित्यिक ह.भ.प. सुनीताताई वाळुंज होत्या, तर पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड बाबा आरगडे होते.
या कार्यक्रमाला उपपोलीस आयुक्त बाबासाहेब बुधवंत, कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे, नामवंत कवी व पोलीस अधिकारी सुभाष सोनवणे, तरवडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते उत्तमराव पाटील, माजी प्राचार्य डॉ. किशोर धनवटे, फाउंडेशनचे अध्यक्ष पांडुरंग रोडगे, माजी सरपंच सौ. निर्मलाताई ढगे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी साहित्यिक संजय दवंगे (कोपरगाव), आरोग्य सेविका श्रीमती बाली थुटटे, कृषिभूषण भागवत गायकवाड (पारनेर), पत्रकार बाबा बेलापूरकर (शेवगाव) तसेच समाजभूषण गोकुळ गायकवाड (जामखेड) यांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
कवी संमेलनात नवोदित कवींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. कलाकार दिगंबर गोंधळी यांनी संबळ वादनासह पोवाडा सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. अध्यक्षीय भाषणात कॉम्रेड बाबा आरगडे यांनी, “देशातील जातिव्यवस्था संपुष्टात आल्याशिवाय खऱ्या अर्थाने देश सुराज्याकडे वाटचाल करू शकत नाही,” असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविवर्य रज्जाक यांनी केले, तर आभार प्रदर्शन पांडुरंग रोडगे यांनी मानले.

