spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedकचऱ्याच्या ढिगाऱ्यात नेवासा; संतप्त नागरिकांचा नगरपंचायतीवर कचराकचरा नगरसेविकापतीचा कचरा टाकून एल्गार...

कचऱ्याच्या ढिगाऱ्यात नेवासा; संतप्त नागरिकांचा नगरपंचायतीवर कचराकचरा नगरसेविकापतीचा कचरा टाकून एल्गार…

सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी केले आंदोलन … 25000 लोकसंख्ये च्या स्वच्छतेसाठी केवळ सहा कर्मचारी


नेवासा

: स्वच्छतेच्या घोषणा फलकांपुरत्याच मर्यादित राहिल्याने नेवासा शहर अक्षरशः कचऱ्याच्या विळख्यात अडकले आहे. दहा-दहा दिवस घंटागाडी फिरकत नसल्याने घराघरांत कचरा साचला असून गल्लीबोळांत दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत असताना संतप्त नागरिकांनी भाजप नेते निरंजन डहाळे व मंडलाध्यक्ष मनोज पारखे यांच्या नेतृत्वाखाली हातगाडीतून शहरातील कचरा गोळा करून थेट नगरपंचायत कार्यालयासमोर टाकत प्रशासनाविरोधात जोरदार निषेध आंदोलन छेडले.


आंदोलक सकाळी नगरपंचायत कार्यालयात धडकले असता, अकरा वाजूनही अधिकारी उपस्थित नसल्याने नागरिकांचा संताप अधिकच अनावर झाला. “शहर घाणीने भरले आणि अधिकारी बेपत्ता” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.


नेवासा नगरपंचायतीकडे शहरातील १७ प्रभागांसाठी तब्बल ११ घंटागाड्या उपलब्ध असतानाही प्रत्यक्षात केवळ तीनच गाड्या सुरू असल्याची धक्कादायक बाब आंदोलनादरम्यान समोर आली. अपुऱ्या गाड्या आणि मनुष्यबळामुळे शहरात सर्वत्र घाणीचे ढीग साचले असून नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे.
यावेळी बोलताना निरंजन डहाळे म्हणाले, “निवडणुकीला पाच महिने उलटले तरी शहरातील मूलभूत प्रश्न कायम आहेत. स्वच्छता विभागाचे अधिकारी व कर्मचारी नागरिकांचे फोनही घेत नाहीत. शहरात सर्वत्र अस्वच्छता पसरली असून अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे सत्ताधाऱ्यांनाच आंदोलन करण्याची वेळ आली आहे. पाणी व स्वच्छता प्रश्न सोडवण्यात आम्ही कमी पडलो, हे मान्य करावे लागेल.”


मंडलाध्यक्ष मनोज पारखे यांनीही प्रशासनावर जोरदार टीका करत, “लोकनियुक्त प्रतिनिधींनाच आंदोलन करावे लागत असेल, तर सामान्य नागरिकांनी कोणाकडे न्याय मागायचा? शहरातील पाणी आणि स्वच्छता प्रश्न गंभीर असताना प्रशासन मात्र सुस्त आहे. तातडीने सुधारणा न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा दिला.


या आंदोलनास विरोधी क्रांतिकारी आघाडी तसेच आम आदमी पक्षाच्या नगरसेवक व कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शविला. आंदोलनात रोहित पवार, विलास बोरुडे, राजेंद्र मुथा, शिवा लष्करे, रामदास लष्करे, श्रीराम लष्करे, राहुल लहीरे, अभिषेक शेजुळ, रोहित लष्करे, दीपक चिंतामणी, आवेज शेख, लखन कुंढारे यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते.
चौकट
२२ कर्मचारी कार्यालयात; स्वच्छतेसाठी फक्त ६ जण!
नेवासा नगरपंचायत कार्यालयात तब्बल २२ कर्मचारी कार्यरत असताना प्रत्यक्ष स्वच्छता मोहिमेसाठी घंटागाड्यांवर केवळ सहाच कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती आंदोलनादरम्यान समोर आली. त्यामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
light rain
29.6 ° C
29.6 °
29.6 °
70 %
6.1kmh
88 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
30 °
Sat
29 °

Most Popular

error: Content is protected !!