spot_img
spot_img
Homeअध्यात्मिकशासनमान्यता मिळाल्याने ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याला नवे वैभव---

शासनमान्यता मिळाल्याने ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याला नवे वैभव—

आमदार विठ्ठलराव लंघे व आमदार मोनिकाताई राजळे यांच्या पाठपुराव्यास यश; वारकरी भाविकांमध्ये आनंदोत्सव

नेवासा प्रतिनिधी
संतभूमी नेवासा येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पायी पालखी सोहळ्याचा शासनमान्य पालखी सोहळ्यांमध्ये समावेश करण्यात आल्याने वारकरी संप्रदायात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पावन कार्यभूमीतून निघणाऱ्या या सोहळ्यास आता शासनाच्या विविध सुविधा मिळणार असून, वारकरी बांधवांचा पायी प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि शिस्तबद्ध होणार आहे.


या मान्यतेसाठी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासा यांचे महंत प. पू. देविदास महाराज म्हस्के, गुरुवर्य श्रीराम महाराज झिंजुर्के, वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार पूज्य रामभाऊ महाराज राऊत यांच्या समवेत शेवगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे व नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, विधानपरिषद अध्यक्ष रामजी शिंदे तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन या सोहळ्यास शासनमान्यता देण्याची मागणी केली होती. याचबरोबर विधानसभा अधिवेशनात आमदार मोनिकाताई राजळे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले होते. अखेर शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्याने वारकरी भक्तांच्या भावना पूर्ण झाल्या आहेत.

पालखी मार्गावर मिळणार विविध शासकीय सुविधा
शासनाकडून आता पालखी मार्गावर व मुक्कामाच्या ठिकाणी टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. स्वच्छता व फिरत्या शौचालयांसाठी सात लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, पालखी तळ व विसाव्याच्या ठिकाणी १०० मोबाईल टॉयलेटची सुविधा उपलब्ध होणार आहे. आरोग्य सुविधांसाठी पाच लाख रुपयांचा निधी देण्यात आला असून, ठिकठिकाणी वैद्यकीय तपासणी केंद्रे, रुग्णवाहिका व आरोग्य शिबिरांची व्यवस्था केली जाणार आहे. याशिवाय पालखी मार्गाची दुरुस्ती, स्वच्छता, विद्युत रोषणाई तसेच वाहतूक व्यवस्थापनासाठी पोलिस बंदोबस्त व नियोजन करण्यात येणार आहे.



श्री क्षेत्र नेवासा येथून ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याची सुरुवात मागील वर्षी करण्यात आली होती. पहिल्याच वर्षी या सोहळ्याला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला होता. तब्बल २७ दिंड्यांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे दिंडी मार्गावर त्र्यंबकेश्वरची निवृत्ती महाराज दिंडी आणि आळंदीची श्री ज्ञानेश्वर महाराज दिंडी यांची ऐतिहासिक व भक्तिमय भेट घडली होती. टाळ-मृदंगाच्या गजरात, “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात आणि अभंगांच्या सुरावटीत हा सोहळा अवघ्या वारकरी विश्वासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता.


यावर्षी या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दिंड्यांची संख्या ३२ वर पोहोचली असल्याचे सांगण्यात येत असून, शासनमान्यता मिळाल्याने यंदाचा सोहळा आणखी दिंड्या यात सामील होऊन भव्यदिव्य स्वरूपात पार पडणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

व्यवस्थापन कमिटी स्थापन


दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने श्री क्षेत्र नेवासा ते श्री क्षेत्र पंढरपूर या पवित्र मार्गावर निघणाऱ्या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याच्या व्यवस्थापन समितीची घोषणा करण्यात आली आहे. समितीत ह.भ.प. गाथामूर्ती राऊत बाबा, वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के, वारकरी भूषण राम महाराज झिंजुर्के, ज्ञानसिंधु भगवानजी महाराज जंगले शास्त्री, हरिभाऊ महाराज भोगे, कैलास आण्णा जाधव तसेच कृष्णा आण्णा पिसोटे यांची निवड करण्यात आली आहे. ही समिती ज्ञानेश्वर मंदिर देवस्थान अंतर्गत कार्यरत राहणार आहे.
अनुभवी, सेवाभावी आणि वारकरी परंपरेचा गाढ अभ्यास असलेल्या व्यक्तींना समितीत स्थान मिळाल्याने पालखी सोहळ्याचे व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध, भक्तिमय आणि प्रेरणादायी होईल, असा विश्वास भाविकांनी व्यक्त केला आहे.

नेवासा नगरीसाठी अभिमानाचा क्षण
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या कार्यभूमीतून निघणाऱ्या या पालखी सोहळ्याला शासनमान्यता मिळणे ही नेवासा नगरीसाठी ऐतिहासिक आणि अभिमानास्पद घटना मानली जात आहे. वारकरी बांधव, माता-भगिनी आणि भाविकांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरला असून, “ज्ञानेश्वरीचा महिमा आता शासनमान्य वैभवातून जगभर पोहोचेल,” अशी भावना भक्तांकडून व्यक्त होत आहे.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
light rain
29.6 ° C
29.6 °
29.6 °
70 %
6.1kmh
88 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
30 °
Sat
29 °

Most Popular

error: Content is protected !!