कामगार पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य चा प्रथम वर्धापन दिन नेवाशात उत्साहात साजरा
नेवासे : ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस पाटील हे प्रशासनातील महत्त्वाचे दुवे असून त्यांच्या कार्यामुळे गावपातळीवरील शांतता आणि समन्वय टिकून राहतो, असे प्रतिपादन माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी केले.
गाव कामगार पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्यच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त नेवासे येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक सागर ढिकले हे प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमास राज्याध्यक्ष शिवाजीराव कोलते पाटील, राज्य खजिनदार विश्वनाथ पाटील, राज्य उपाध्यक्ष अरूण बोडके पाटील, जब्बारभाई पठाण, सहसचिव डी. एस. कांबळे, गोरक्ष टेमकर तसेच संस्थापक सदस्य संतोष पवार पाटील यांच्या कार्याचे उपस्थित वक्त्यांनी विशेष कौतुक केले
. संघटनेच्या स्थापनेपासूनचा प्रवास, आलेल्या अडचणी, विविध प्रशासकीय स्तरांवरील पाठपुरावे आणि संघटनेने उभारलेले कार्य यांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले.
मागील एका वर्षात मंत्रालयीन स्तरावर पोलीस पाटीलांच्या विविध प्रश्नांबाबत संघटनेने सातत्याने पाठपुरावा केल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मानधनवाढ, सेवा निवृत्ती वयोमर्यादा वाढ, आरोग्य कार्ड, निवृत्तीनंतर आर्थिक मदत, विविध योजनांचा लाभ तसेच प्रशासकीय अधिकार यांसंदर्भातील मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्यात आल्याचे सांगण्यात आले. ग्रामीण भागातील पोलीस पाटीलांच्या प्रश्नांवर संघटनेने प्रभावी आवाज उठवून प्रशासनाशी समन्वय साधल्याचेही वक्त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात संघटनेचा वार्षिक आर्थिक अहवाल व जमाखर्च पारदर्शक पद्धतीने सादर करण्यात आला. संघटनेचे आर्थिक व्यवहार शिस्तबद्ध व सदस्यांच्या विश्वासास पात्र पद्धतीने ठेवण्यात आल्याबद्दल उपस्थित सदस्यांनी समाधान व्यक्त केले.
पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांनी संघटनात्मक एकजूट, शिस्त आणि पारदर्शक नेतृत्व हीच संघटनेच्या यशाची खरी ताकद असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात राज्याध्यक्ष शिवाजीराव कोलते पाटील यांनी संघटनेचे ध्येय, धोरण आणि भविष्यातील वाटचालीविषयी मार्गदर्शन केले. संघटना ही केवळ पदांची नसून पोलीस पाटीलांच्या न्यायहक्कांसाठी लढणारी चळवळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यभरातील पोलीस पाटीलांना संघटित करून त्यांच्या प्रश्नांना शासन स्तरावर प्रभावीपणे मांडण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
भविष्यात जिल्हा व तालुका स्तरावर संघटना अधिक मजबूत करण्यासोबतच पोलीस पाटीलांना कायदेशीर, प्रशासकीय व सामाजिक पातळीवर सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. संघटनेत पारदर्शकता, शिस्त, निष्ठा आणि एकजूट कायम ठेवून सर्वसामान्य पोलीस पाटीलांना केंद्रस्थानी ठेवून कार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान विविध जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करत संघटनेच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. पोलीस पाटीलांच्या न्यायहक्कांसाठी भविष्यात अधिक ताकदीने कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे संस्थापक सदस्य तथा बुलढाणा जिल्हाध्यक्ष राजेंद्र भामद्रे पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अशोक थेटे पाटील यांनी केले.
या वर्धापन दिन सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी मुकिंदपूरचे पोलीस पाटील आदेश साठे, सुभाष भांगे, संदीप लहारे, संदीप फाटके, बाळासाहेब साळुंके, रजिया शेख, स्वाती घोरपडे पाटील, अंजली काळे, स्मिता लवांडे, अनिता मते, सविता पाटील, सुनीताताई तुपे, सोनाली मते व संभाजी कर्डीले यांच्यासह सर्व पोलीस पाटील बंधू-भगिनींनी विशेष परिश्रम घेतले.

