spot_img
spot_img
Homeप्रशासननेवासा नगरपंचायतीत ठरावांचा ‘कागदी खेळ’; कोट्यवधींच्या योजनेसाठी बनावट मंजुरीचा आरोप!

नेवासा नगरपंचायतीत ठरावांचा ‘कागदी खेळ’; कोट्यवधींच्या योजनेसाठी बनावट मंजुरीचा आरोप!

जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव,मुख्याधिकारी निखिल फराटे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी ….


नेवासा : नेवासा नगरपंचायतीत ‘नागरिक दलितेतर वस्ती सुधार योजना २०२५-२६’ अंतर्गत विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी मिळविण्याच्या उद्देशाने बनावट ठराव तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, या प्रकरणामुळे नगरपंचायत प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

उपनगराध्यक्ष शालिनी संजय सुखधान यांच्यासह अनेक नगरसेवकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत मुख्याधिकारी निखिल फराटे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.


नगरसेवकांनी दिलेल्या निवेदनानुसार, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या प्रशासकीय सभेत केवळ १२ विषयांवर चर्चा होऊन मंजुरी देण्यात आली होती. मात्र त्यानंतर काढण्यात आलेल्या आदेशात ठराव क्रमांक २०, २२, २३ व २४ चा आधार घेत विविध विकासकामांना मंजुरी दर्शविण्यात आली. सभेतील विषय १२ वरच संपले असताना पुढील ठराव आले कुठून? असा संतप्त सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला आहे.


या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सभेच्या प्रोसीडिंग पुस्तकात पान क्रमांक ९६ नंतरची पाने पूर्णपणे कोरी असल्याचे समोर आले आहे. त्यावर सभेची समाप्ती नोंद, अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या किंवा प्रशासनाची कोणतीही नोंद नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे ठराव बनावट पद्धतीने नंतर घुसडण्यात आल्याचा संशय अधिक गडद झाला आहे.


नगरसेवकांनी माहिती अधिकारातून कागदपत्रांची मागणी केल्यानंतर सभा लिपिक योगेश गवळी यांनी लेखी उत्तर देत ३१ ऑक्टोबरच्या सभेत फक्त १२ विषय मंजूर झाल्याचे स्पष्ट केले. प्रशासनातील कर्मचाऱ्याच्या या खुलाशामुळे मुख्याधिकाऱ्यांनी वापरलेले ठराव खोटे असल्याचा आरोप अधिक तीव्र झाला आहे.
शासकीय अभिलेखात फेरफार करून जिल्हा प्रशासनाची दिशाभूल करणे हा भारतीय न्याय संहितेनुसार गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा असल्याचे नमूद करत संबंधित योजना तातडीने रद्द करावी तसेच दोषींवर कठोर कारवाई करून त्यांना गजाआड करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.


या निवेदनावर उपनगराध्यक्ष शालिनी संजय सुखधान, गटनेते जितेंद्र कुऱ्हे, नगरसेविका जयश्री शिंदे, संभाजी धोत्रे, सागर मापारी, इलयात खान पठाण, सोनल चव्हाण, नुसरीन शेख, शोभा व्यवहारे, प्रतिभा गवळी तसेच स्वीकृत नगरसेवक राजेंद्र काळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या गंभीर आरोपांनंतर आता जिल्हाधिकारी प्रशासन कोणती कारवाई करते, याकडे संपूर्ण नेवासा तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
light rain
29.6 ° C
29.6 °
29.6 °
70 %
6.1kmh
88 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
30 °
Sat
29 °

Most Popular

error: Content is protected !!