spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedशेतकऱ्यांच्या घामावर डल्ला! पांढरीपुल एमआयडीसीत बनावट खत कारखान्यावर धाड; २१.८० लाखांचा साठा...

शेतकऱ्यांच्या घामावर डल्ला! पांढरीपुल एमआयडीसीत बनावट खत कारखान्यावर धाड; २१.८० लाखांचा साठा जप्त!

शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कडक कारवाईची गरज!


नेवासा प्रतिनिधी :
शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पैशांवर डल्ला मारत त्यांच्या पिकांचे आणि भवितव्याचे नुकसान करणाऱ्या बनावट खत माफियांचा आणखी एक धक्कादायक प्रकार नेवासा तालुक्यात उघडकीस आला आहे. पांढरीपुल (शिंगवे तुकाई) एमआयडीसी परिसरातील एका खत कंपनीवर कृषी विभागाने टाकलेल्या धाडीत विविध कंपन्यांच्या नावाने बनावट पद्धतीने रासायनिक खतांचे उत्पादन, पॅकिंग व साठवणूक सुरू असल्याचे समोर आले. या कारवाईत तब्बल २१ लाख ८० हजार ४८६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित कंपनीचे मालक किरण चंद्रकांत दौंडकर (रा. केडगाव, जि. अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


विशेष म्हणजे, काही वर्षांपूर्वी नेवासा गावानजीक देखील अशाच प्रकारचा बोगस खत निर्मितीचा कारखाना पकडण्यात आला होता. त्यावेळी मोठ्या गाजावाजात कारवाई झाली; मात्र त्या प्रकरणातील पुढील तपास, दोषींवर झालेली कारवाई आणि अंतिम निकाल याबाबतची माहिती आजपर्यंत स्पष्टपणे समोर आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहे की, केवळ धाडी टाकून फोटोसेशन करण्यापुरतीच कारवाई होते की खरोखर दोषींना शिक्षा होते?


कृषी अधिकारी वाल्मिक एकनाथ सुडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. १५ जून रोजी रात्री ९ वाजल्यापासून १६ जून रोजी पहाटे २.३० वाजेपर्यंत कृषी गौरव फर्टिलायझर्स प्रा. लि. येथे ही कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान कंपनीकडे स्वतःच्या नावाने खत उत्पादन व विक्रीचा परवाना असतानाही इतर विविध कंपन्यांच्या नावाने खतांचे उत्पादन, पॅकिंग आणि अनधिकृत साठवणूक केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले.


कृषी विभागाने पंचांसमक्ष खतांचे नमुने घेत काही गोण्या सीलबंद केल्या तर उर्वरित साठा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या खतांमध्ये विविध कंपन्यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या २,०३४ गोण्या असून त्यांची अंदाजे किंमत ₹२१,८०,४८६ इतकी आहे.


या प्रकरणी बी.एन.एस. कलम ३१८(४) तसेच रासायनिक खत (नियंत्रण) आदेश १९८५ मधील संबंधित तरतुदी आणि आवश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे करीत आहेत.
ही यशस्वी कारवाई विकास काळे, निलेश अभंग, वाल्मीक सुडके, सुहास धस, राहुल कदम यांच्या संयुक्त पथकाने प्रत्यक्ष घटनास्थळी पार पाडली. या मोहिमेसाठी सुनील बोरकर, बाळासाहेब जेजुरकर, देशमुख, सुधाकर बोराळे, सुधीर शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.


शेतकऱ्यांचा संतप्त सवाल
बोगस बियाणे, बनावट कीटकनाशके आणि आता बनावट खतांचे जाळे दिवसेंदिवस वाढत आहे. अशा बनावट खतांचा वापर केल्यास पिकांचे मोठे नुकसान होते, उत्पादन घटते आणि आर्थिक फटका थेट शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे अशा प्रकारांना केवळ गुन्हा म्हणून न पाहता शेतकऱ्यांच्या जीवाशी व उपजीविकेशी खेळण्याचा गंभीर गुन्हा म्हणून पाहण्याची गरज आहे.


नेवासा तालुक्यात यापूर्वी पकडलेल्या बोगस खत कारखान्याच्या प्रकरणाचा निकाल काय लागला, दोषींना शिक्षा झाली का, जप्त मालाचे पुढे काय झाले, याची माहिती प्रशासनाने जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. अन्यथा अशा कारवाया केवळ कागदोपत्री राहतील आणि बनावट खतांचे रॅकेट पुन्हा डोके वर काढत राहील, अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
few clouds
28.9 ° C
28.9 °
28.9 °
62 %
6.7kmh
11 %
Wed
40 °
Thu
40 °
Fri
40 °
Sat
40 °
Sun
40 °

Most Popular

error: Content is protected !!