ग्राहक पेट्रोल पंप चालक आणि शासकीय पातळीवर उपयोगी पडणारे पूर्ण भारतीय बनावटीचे ॲप
नेवासा (प्रतिनिधी)
: नेवासा येथील अस्थिरोग शल्यचिकित्सक व नेवासा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. किशोरकुमार जयराम गळनिंबकर यांनी पूर्णपणे स्वयंनिर्मित व विकसित केलेल्या ‘इंधनशोधक™’ या भारतातील पहिल्या सामुदायिक रिअल-टाइम इंधन उपलब्धता ट्रॅकिंग मोबाईल अॅपचे अधिकृत लॉन्च राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मुंबई येथे पार पडल्याची माहिती नेवासा येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

यावेळी नेवासा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले पाटील, डॉ. वरुणराज देवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुंबईतील लॉन्च कार्यक्रमास नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील व नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले पाटील उपस्थित होते. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतः अॅपचा वापर करून त्याच्या कार्यपद्धतीची पाहणी केली आणि या उपक्रमाला शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
डॉ. गळनिंबकर यांनी सांगितले की, ‘इंधनशोधक हे देशातील पहिले असे मोबाईल अॅप आहे, जे नागरिकांना त्यांच्या परिसरातील पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल व सीएनजीची उपलब्धता रिअल-टाइममध्ये दर्शविते. त्यामुळे इंधनटंचाईच्या काळात नागरिकांना घरबसल्या जवळच्या पंपावरील इंधनस्थितीची माहिती मिळू शकते. हे ॲप ग्राहक पेट्रोल पंप चालक आणि शासकीय अधिकारी या तीन स्तरावर वापरल्यास सर्वांनाच उपयोगी ठरणार आहे
अॅपमध्ये थेट जीपीएस नकाशा, सामुदायिक रिपोर्टिंग, पंप मालकांकडून द्विस्तरीय सत्यापन प्रणाली, विश्वासार्ह डेटा व्यवस्थापन, संकटकाळातील क्यूआर-आधारित इंधन रेशनिंग व्यवस्था, काळाबाजार रोखण्यासाठी विशेष यंत्रणा तसेच शासकीय वापरासाठी जिल्हास्तरीय निरीक्षण डॅशबोर्ड अशा सुविधा उपलब्ध आहेत. हे अॅप १२ भारतीय भाषांमध्ये विकसित करण्यात आले असून देशातील सर्व २८ राज्यांमध्ये विस्तार करण्यास सक्षम आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी कोणताही शासकीय निधी वापरण्यात आलेला नसून संपूर्ण अॅप स्वतःच्या खर्चातून विकसित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. गळनिंबकर यांनी अॅपच्या अधिकृत नोंदणीची माहिती देताना MSME अंतर्गत UDYAM-MH-01-0299118 नोंदणी, भारत सरकारकडील SW-26937/2026-CO कॉपीराइट, तसेच पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय, PPAC आणि PNGRB यांच्याकडे आवश्यक प्रस्ताव व शिफारसी सादर करण्यात आल्याचे सांगितले.
चौकट : राष्ट्रीय गरज लक्षात घेऊन विकसित झाले ‘इंधनशोधक™’
मार्च ते जून २०२६ दरम्यान आखाती युद्धामुळे हॉरमुज सामुद्रधुनीतील तणावामुळे देशात अनेक भागांत पेट्रोल पंपांवर मोठ्या रांगा लागल्या होत्या. व स्वतः डॉक्टरांना इंधन मिळण्यासाठी अडचण आलीच अशा आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना – परिसरातील इंधन उपलब्धतेची अचूक माहिती मिळावी, अनावश्यक गर्दी टाळावी आणि प्रशासनालाही प्रभावी नियोजन करता यावे या उद्देशाने ‘इंधनशोधक™’ विकसित करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने राष्ट्रीय स्तरावर या तंत्रज्ञानाचा विचार करावा, अशी मागणीही डॉ. गळनिंबकर यांनी केली.

