यावर्षी विशारद पदवी मिळवलेली नेवासातील एकमेव विद्यार्थी
नेवासा
सातत्यपूर्ण रियाज आणि संगीतावरील अखंड निष्ठेच्या बळावर नेवासा येथील तृप्ती विवेक देवचक्के हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ‘अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई’ यांच्या वतीने एप्रिल-मे २०२६ सत्रात घेण्यात आलेल्या संगीत विशारद (गायन) परीक्षेत तिने प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत नेवासा परिसराच्या शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे.
तृप्ती ही नेवासा येथील कृष्णा संगीत विद्यालयाची विद्यार्थिनी असून, यावर्षी कृष्णा संगीत विद्यालयामार्फत संगीत विशारद ही उच्च पदवी प्रथम श्रेणीत संपादन करणारी ती एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे. तिच्या या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची आणखी एकदा प्रचिती आली आहे.
तृप्तीच्या या यशामागे विद्यालयाचे संचालक व गुर कृष्णा कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. नियमित रियाज, कठोर परिश्रम आणि गुरूंच्या मार्गदर्शनामुळे तिने ही प्रतिष्ठेची परीक्षा उज्ज्वल यशाने पार केली.
तृप्ती देवचके हिच्या या यशाबद्दल नेवासा परिसरातील शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून तिचे अभिनंदन करण्यात येत असून, तिच्या पुढील संगीत साधनेसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत

