दहशत कमी व्हावी म्हणून नेवासा फाटा आणि नेवासा येथे काढली गुन्हेगारांची वरात….
नेवासा (प्रतिनिधी) : नेवासा फाटा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ भरदुपारी एका १९ वर्षीय तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करून दहशत माजविणाऱ्या चार गुंडांना नेवासे पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासांत जेरबंद करत त्यांची नेवासा फाटा व नेवासा परिसरातून वरात काढली. पोलिसांच्या या धडक कारवाईची तालुकाभर जोरदार चर्चा रंगली.
नेवासा खुर्द येथील साहिल आसाराम खाजेंकर (वय १९) हा त्याच्या आजीला भेटण्यासाठी नेवासा फाटा येथील रुग्णालयात आला होता. तो पूजा फास्ट फूडसमोर उभा असताना पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून आलेल्या चौघांनी जुन्या वादाच्या कारणावरून त्याला गाठले. शिवीगाळ करत आरोपींनी साहिलवर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात साहिल गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
भरदिवसा अहिल्यानगर संभाजीनगर महामार्गावर घडलेल्या या थरारक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार, उपनिरीक्षक विकास पाटील, वाहतूक शाखेचे किरण गायकवाड, संतोष राठोड, सुमित करंजकर, सुनील गंगावणे व परमेश्वर गहाळ यांच्या पथकाला रवाना केले. तात्काळ नाकाबंदी करून पोलिसांनी आरोपींचा माग काढत कारसह कोयता जप्त केला आणि चारही आरोपींना ताब्यात घेतले.
रवींद्र बाळासाहेब शिंदे, रोहित अंकुश बर्डे, सोमनाथ सुरेश चांदणे आणि संदेश संजय गायकवाड (सर्व रा. नेवासा बुद्रुक) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दहशत माजविणाऱ्या या आरोपींना पोलिसांनी घटनास्थळी आणून नेवासा फाटा व नेवासा परिसरातून वरात काढत कायद्याचा धाक दाखविला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांनी घटनास्थळी भेट दिली. अल्पावधीत आरोपींना अटक करून प्रभावी कारवाई केल्याबद्दल त्यांनी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे व त्यांच्या संपूर्ण पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे कौतुक केले.

