नेवासा (प्रतिनिधी) : ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पायी पालखी दिंडी सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असलेल्या श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या रथाचे चांदीचे वर्ख नव्याने उजळविण्याचे काम पूर्ण झाले असून, रथाला नवचैतन्य प्राप्त झाले आहे. रथातील माऊलींच्या पादुकाही झळाळून निघाल्या असून, पैस खांबाच्या प्रतिकृतीलाही आकर्षक रंगसंगती देत कलात्मक स्वरूप प्राप्त झाले आहे.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध चित्रकार भरतकुमार उदावंत आणि सत्यजित उदावंत यांनी पैस खांबाच्या प्रतिकृतीवर कलाकुसर करत ती अधिक देखणी बनविली आहे. त्यामुळे यंदाच्या पालखी सोहळ्यात हा रथ भाविकांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
रथावरील चांदीचे वर्ख उजळविण्याचे काम नेवासा बुद्रुक येथील जगदंब तरुण मित्र मंडळाने केले असून, पालखी सोहळ्यादरम्यान दररोज विविध प्रकारच्या फुलांनी रथाची आकर्षक सजावट केली जाणार आहे.

दरम्यान, श्री ज्ञानेश्वर मंदिरापासून पालखीच्या संपूर्ण मार्गावर नागरिकांनी रांगोळ्या काढून, भगवे ध्वज फडकावून तसेच स्वागत कमानी उभारून दिंडीचे जल्लोषात स्वागत करावे, असे आवाहन ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पायी पालखी सोहळा भक्त मंडळाने केले आहे. नेवासा शहरात विविध ठिकाणी भव्य स्वागत कमानी व स्वागत फलक उभारण्यास सुरुवात झाली असून, नेवासा फाट्यापर्यंत दिंडीचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यासाठी नागरिकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.

