श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज संस्थान पालखी सोहळ्या’साठी देवीदासजी महाराजांचे मोठे योगदान!
‘
नेवासा : वारकरी संप्रदायातील एक थोर, निस्पृह आणि ‘निरपेक्ष कीर्तनकार’ म्हणून ओळखले जाणारे, श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज संस्थान (नेवासा) चे विश्वस्त तथा महंत पूज्य गुरुवर्य वेदांताचार्य ह.भ.प. देवीदास महाराज म्हस्के यांनी आपल्या अलौकिक दातृत्वाने संपूर्ण वारकरी जगतासमोर एक नवा आणि आदर्श वस्तुपाठ निर्माण केला आहे
. “कोणतेही व्यावहारिक मानधन न घेता केवळ संतविचारांचा प्रचार आणि प्रसार करणे” हाच ध्यास घेतलेल्या देवीदास महाराज निरपेक्ष भावनेने गावोगाव कीर्तन करतात. आता आपल्याला भाविकांकडून पायावर मिळालेली दक्षिणाही माऊलींच्या चरणी अर्पण केली आहे.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर, यापूर्वी ‘श्रीगुरु विठ्ठल महाराज घुले दिंडी (क्र. २)’ आणि ‘ओम चैतन्य अडभंगनाथ देवस्थान दिंडी (क्र. १०)’ या प्रमुख दिंड्यांना भरीव आर्थिक मदत केल्यानंतर, आता देवीदास महाराज यांनी थेट श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज संस्थान पालखी सोहळ्यासाठी एक लाख एक हजार एकशे अकरा रुपयांची देणगी सुपूर्द केली आहे.
संस्थानाचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्याकडे देविदास महाराज म्हस्के यांनी ही देणगी सुपूर्त केली. महाराजांच्या या नि:स्पृह वृत्तीमुळे वारकरी संप्रदायातून त्यांचे विशेष कौतुक व आदर व्यक्त केला जात आहे. कोणत्याही मोहाशिवाय किंवा व्यावहारिक अपेक्षेविना केवळ संतांचे विचार जनमानसात रुजवणारे देवीदास महाराज हे खऱ्या अर्थाने वैष्णव परंपरेचा दीपस्तंभ ठरत आहेत, अशा भावना यावेळी व्यक्त झाल्या.
या महत्त्वपूर्ण देणगी सुपूर्त प्रसंगी श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त कृष्णा पिसोटे, कैलास जाधव, भैय्या कावरे, संकेत गवळी, तसेच संस्थानचे व्यवस्थापक रवी जमदाडे आणि भीमाशंकर जाधव यांच्यासह वारकरी संप्रदायातील अनेक भाविक आणि प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.
देवीदास महाराजांनी दाखवलेल्या या दातृत्वामुळे आणि निरपेक्ष भावनेमुळे संपूर्ण पालखी सोहळ्यात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, हा सोहळा माऊलींच्या विचारांचा खरा लोकजागरण सोहळा ठरेल असा विश्वास व्यक्त होत आहे.

