जिल्ह्यातील संपूर्ण युवासेना संघटन बरखास्त होऊन शिंदे सेनेत दाखल…
नेवासे | प्रतिनिधी
नेवासा तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला आणखी एक मोठा धक्का बसला असून, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अॅड. नीरज नांगरे यांनी शेकडो समर्थकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

या प्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये नव्याने खळबळ उडाली असून, महायुतीच्या बळात भर पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. प्रवेशाच्या वेळी शिवसेनेचे नेते प्रभाकर काका शिंदे आमदार विठ्ठल राव लंघे उपस्थित होते
पत्रकार परिषदेत बोलताना अॅड. नांगरे यांनी उबाठा गटावर गंभीर आरोप करताना सांगितले की, “बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांसाठी आम्ही तन-मन-धनाने काम केले. प्रत्येक निवडणुकीत पक्षाचा आदेश मानला. मात्र नगरपंचायत निवडणुकीत उमेदवार आणि पॅनल तयार करूनही आम्हाला एबी फॉर्म नाकारण्यात आला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेटही होऊ दिली नाही. निष्ठावान कार्यकर्त्यांचा सातत्याने अपमान झाला. कार्यकर्त्यांना सन्मान नसलेल्या पक्षात राहण्यापेक्षा आम्ही जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.”
ते पुढे म्हणाले, “गेली बारा वर्षे युवा सेनेत जिल्हा प्रतिनिधी आणि जिल्हाप्रमुख म्हणून काम केले. मात्र कोणत्याही निर्णयात आम्हाला विश्वासात घेतले गेले नाही. मुंबईत जाऊनही आमचे म्हणणे ऐकले गेले नाही. त्याउलट एकनाथ शिंदे यांनी स्वतः आमचे स्वागत केले, आमच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आणि ‘तालुक्यात युवकांचे मजबूत संघटन उभारा, निधी कमी पडू देणार नाही, प्रत्येक निर्णयात तुम्हाला विश्वासात घेतले जाईल,’ अशी ग्वाही दिली. त्यामुळे आता संपूर्ण ताकदीने शिवसेना बळकट करण्यासाठी आम्ही रात्रंदिवस काम करू.” आणि गावगाव सेनेच्या शाखा स्थापन केल्या जातील
अॅड. नांगरे यांनी नेवासा तालुक्यात शिवसेनेच्या शाखा उभारून युवकांना संघटित करण्याचा निर्धार व्यक्त करत, “तालुक्यात भगवे वादळ निर्माण करू आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाला युवकांचे भक्कम पाठबळ उभे करू,” असे स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला अॅड. अभिजित काळे, प्रकाश शेजुळ, भरत नांगरे, पप्पू शेजुळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
राजकीय वर्तुळात या पक्षप्रवेशाकडे महत्त्वाच्या घडामोडी म्हणून पाहिले जात असून, खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर आता युवा सेनेतील पदाधिकाऱ्यांचाही ओघ सुरू झाल्याने नेवासा तालुक्यात शिंदे यांच्या शिवसेनेची आणि आमदार विठ्ठलराव लंघे यांची ताकद आणखी वाढल्याचे मानले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाचे राजकीय परिणाम दिसतील.

