तीन महिन्यांच्या कालावधीत एकूण ३,९२४ वाहनांद्वारे ६० हजार ६५० क्विंटल कांद्याची विक्री….
नेवासा
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अवघ्या तीन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या खुल्या कांदा मार्केटने अल्पावधीतच विक्रमी कामगिरी करत तब्बल ७ कोटी ५० लाख ६५ हजार ३०२ रुपयांची उलाढाल केली आहे. समाधानकारक दर, तात्काळ रोख पेमेंट आणि पारदर्शक लिलाव पद्धतीमुळे नेवासा कांदा मार्केटवर शेतकऱ्यांचा विश्वास दिवसेंदिवस दृढ होत असल्याचे चेअरमन नंदकुमार पाटील यांनी सांगितले
माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली ६ मे २०२६ रोजी सुरू झालेल्या या मार्केटमध्ये सुरुवातीला मंगळवार व गुरुवारी लिलाव होत होता. मात्र, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वाढत्या प्रतिसादामुळे संचालक मंडळाने रविवारीही लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बाजारातील व्यवहारांना अधिक गती मिळाली.
मे ते जुलै या तीन महिन्यांच्या कालावधीत एकूण ३,९२४ वाहनांद्वारे ६० हजार ६५० क्विंटल कांद्याची आवक झाली. मे महिन्यात १९ हजार ३८७ क्विंटल कांद्याच्या विक्रीतून १ कोटी ४२ लाख २९ हजार ९११ रुपये, जूनमध्ये २६ हजार ५५९ क्विंटल कांद्यावर ३ कोटी २१ लाख ६२ हजार ८९ रुपये, तर जुलैमध्ये १४ हजार ७०४ क्विंटल कांद्यावर २ कोटी ८६ लाख ७३ हजार ३०२ रुपयांची उलाढाल झाली.
नेवासा येथील उच्च प्रतीच्या कांद्याला आता परदेशातूनही मागणी वाढली असून येथून दुबईला कांद्याची निर्यात करण्यात आली आहे. त्यामुळे नेवासा कांदा मार्केटची ओळख राज्याच्या सीमा ओलांडून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही निर्माण होत आहे. लिलावानंतर शेतकऱ्यांना तात्काळ रोख रक्कम दिली जात असल्याने व्यापारी आणि उत्पादक दोघांचाही या बाजारावर विश्वास वाढला आहे.
समाधानकारक भाव मिळत असल्याने नेवासा तालुक्यासह परिसरातील इतर तालुक्यांतील शेतकरीही मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीसाठी येथे येत आहेत. वाढत्या व्यवहारांमुळे नेवासा शहरातील व्यापारी उलाढालही वाढली असून स्थानिक बाजारपेठेला नवी आर्थिक चालना मिळाल्याचे दिसून येत आहे.
याबाबत माहिती देताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा आणि योग्य दर मिळावेत यासाठी संचालक मंडळ सातत्याने प्रयत्नशील असून माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनामुळे नेवासा कांदा मार्केटने अल्पावधीतच वेगळी ओळख निर्माण केली आहे.
चौकट : कामिका एकादशीमुळे रविवारी कांदा लिलाव बंद
९ ऑगस्ट रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या कामिका एकादशी यात्रेनिमित्त नेवासा येथे भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने त्या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील रविवारचा खुला कांदा लिलाव होणार नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी त्या दिवशी विक्रीसाठी कांदा आणू नये, असे आवाहन सभापती नंदकुमार पाटील यांनी केले आहे.

