तातडीने आवर्तन सोडा, अन्यथा रस्त्यावर उतरू; शिवसेना उपजिल्हाप्रमुख भगवानराव गंगावणे यांचा प्रशासनाला इशारा
माका-
आदिनाथ म्हस्के याज कडून
ऑगस्ट महिना सुरू होऊनही नेवासा तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे.
मुळा धरणाच्या लाभक्षेत्रातील अनेक गावांमध्ये उभी पिके करपू लागली असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर मुळा उजव्या कालव्यातून तातडीने आवर्तन सोडावे, अन्यथा शिवसेना (शिंदे गट)च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना (शिंदे गट)चे उपजिल्हाप्रमुख तथा नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भगवानराव गंगावणे यांनी दिला आहे.
महालक्ष्मी हिवरे, माका, देडगाव, पाचुंदा, तेकुडगाव, चिलेखनवाडी, नांदूर शिकारी, जेऊर हैबती, कुकाणा, वडुले आदी गावांमध्ये पावसाअभावी सोयाबीन, मका, बाजरीसह खरीप पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. विहिरी व बोअरवेलवरील वाढता ताण आणि कमी दाबाने होणारा वीजपुरवठा यामुळे सिंचन करणेही शेतकऱ्यांसाठी कठीण बनले आहे.
मुळा धरणात सुमारे ७७ टक्के पाणीसाठा उपलब्ध असताना उभ्या पिकांना जीवदान देण्यासाठी तातडीने आवर्तन सोडण्यास कोणतीही अडचण नसल्याचे गंगावणे यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास वाचविण्यासाठी प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी शिवसेना (शिंदे गट)च्या पदाधिकारी व शिवसैनिकांनीही तातडीने आवर्तन जाहीर करण्याची मागणी केली. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र लोकआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
धोक्यातील प्रमुख गावे
महालक्ष्मी हिवरे, माका, देडगाव, पाचुंदा, तेकुडगाव, चिलेखनवाडी, नांदूर शिकारी, जेऊर हैबती, कुकाणा, वडुले यांसह मुळा धरणाच्या लाभक्षेत्रातील अनेक गावांमध्ये पावसाअभावी खरीप पिके संकटात सापडली आहेत.

