spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedपावसाच्या सरींवर सरी अन् वारकऱ्यांच्या लाटांवर लाटा!

पावसाच्या सरींवर सरी अन् वारकऱ्यांच्या लाटांवर लाटा!

कामिका वद्य एकादशीला नेवासा नगरीत लाखो भाविकांची मांदियाळी; माऊलींच्या ‘पैस’ खांबाच्या दर्शनासाठी दोन किलोमीटरची रांग



नेवासा | प्रतिनिधी
दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या… तरीही हरिनामाचा गजर करत नेवासाकडे येणाऱ्या वारकऱ्यांच्या लाटा काही थांबत नव्हत्या… ‘ज्ञानेश्वर माऊली… माऊली ज्ञानेश्वर’, ‘पंढरीनाथ महाराज की जय’ अशा जयघोषाने नेवासानगरी अक्षरशः दुमदुमून गेली होती… आणि माऊलींच्या ‘पैस’ खांबाच्या दर्शनासाठी उसळलेला लाखो भाविकांचा जनसागर, अशा भक्तिमय वातावरणात कामिका वद्य एकादशीचा यात्रा सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. पावसाची पर्वा न करता गावोगावांहून आलेल्या शेकडो दिंड्यांनी नेवासात प्रवेश केल्याने संपूर्ण तीर्थक्षेत्राला वारकरी नगरीचं रूप आलं होतं.
कामिका एकादशी ही ‘धाकटी एकादशी’ किंवा ‘ज्ञानेश्वरांची एकादशी’ म्हणून ओळखली जाते. संत ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं रचनास्थळ असल्यामुळे नेवासाला या एकादशीला खास धार्मिक महत्त्व आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी गेलेले वारकरी माऊलींच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी नेवासाला येतात. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भाविकांनी नेवासात मोठी गर्दी केली होती.
यंदा ग्रंथराज ज्ञानेश्वरी दिंडी-पालखी सोहळ्यांमुळे दिंड्यांची संख्या खूपच वाढली. सकाळी दहानंतर शेकडो दिंड्या टाळ-मृदंगाच्या गजरात, हरिनामाचा जयघोष करत नेवासात दाखल होत होत्या. दिवसभर पाऊस सुरू असतानाही वारकऱ्यांचा उत्साह अजिबात कमी झाला नाही. एकामागोमाग एक दिंडी येत राहिल्या आणि नेवासाकडे येणारी वारकऱ्यांची अखंड लाट दिवसभर दिसत राहिली.
पहाटे तीन वाजताच माऊलींची महापूजा
एकादशीच्या निमित्ताने पहाटे तीनच्या सुमारास वेदमंत्रांच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त तथा ग्रंथराज ज्ञानेश्वर पालखी सोहळा प्रमुख सदस्य देविदास म्हस्के यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यावेळी संस्थानचे सर्व विश्वस्त उपस्थित होते. पौरोहित्य मनोज भालेराव गुरु यांनी केले. पहाटेच्या आरतीवेळी मंदिराच्या गाभाऱ्यात आणि परिसरात एक हजारांहून अधिक भाविक उपस्थित होते. आरतीनंतर आतषबाजीही करण्यात आली.
सूर्योदयापूर्वीच २० हजार भाविकांचे दर्शन
दर्शनासाठी पहाटेपासूनच नेवासानगरीत भाविकांची गर्दी सुरू झाली होती. मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन सूर्योदयापूर्वीच सुमारे २० हजार भाविकांनी माऊलींचे दर्शन घेतले. पहाटे साडेतीनपासून दर्शनबारीच्या एक किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी साडेचार वाजता अभिषेक व आरती झाल्यानंतर दर्शनबारी सुरू करण्यात आली. दिवसभर वाढत गेलेल्या गर्दीमुळे दर्शनबारीची रांग सुमारे दोन किलोमीटरपर्यंत पोहोचली होती.
३०० दिंड्यांचे रिंगण; परिसर दुमदुमला
संत ज्ञानेश्वर मंदिराच्या प्रांगणाबाहेर एकादशीच्या निमित्ताने सुमारे ३०० दिंड्यांचे रिंगण सोहळे पार पडले. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याच्या रथाचे दर्शन घेण्यासाठीही भाविकांनी मोठी गर्दी केली. वारकऱ्यांच्या टाळ-मृदंगाचा निनाद, हरिनामाचा गजर आणि माऊलींच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. दर्शनबारीसह मुखदर्शनाचीही व्यवस्था करण्यात आली होती.
मंदिरापासून बसस्थानकापर्यंत विविध दुकाने थाटण्यात आली होती. विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार पांडुरंग अभंग आणि सर्व विश्वस्त मंडळ दिवसभर भाविकांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.
अन्नदानातून सेवाभावाचा उच्चांक
यात्रेनिमित्त भाविकांसाठी विविध संस्था, मंडळे आणि दानशूर व्यक्तींच्या वतीने मोठ्या प्रमाणावर अन्नदान करण्यात आले. मंदिर प्रांगणात पंचगंगा सिड्स कंपनीचे प्रभाकर शिंदे व आमदार शंकरराव गडाख मित्र मंडळाच्या वतीने साबुदाणा खिचडीचा प्रसाद वाटण्यात आला. मंदिराकडे येणाऱ्या मार्गावर रविराज तलवार यांच्या वतीने खिचडीचे वाटप करण्यात आले. स्वप्नील मगर यांनी दिवसभर पाण्याचे वाटप केले.
बाजार समितीचे चेअरमन तथा माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्या लोकनेते मारुतराव घुले पाटील पतसंस्थेसह सुवर्णकार समाजाच्या वतीने संत नरहरी महाराज मंदिरात भाविकांना मसाला दूध वाटप करण्यात आले. आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या कार्यालयात तसेच नागेबाबा पतसंस्थेच्या वतीने पावन गणपतीसमोर दिवसभर खिचडीचे वाटप सुरू होते.
मोहिनीराज मंदिराजवळ ब्राह्मण संघटनेच्या वतीने दिवसभर चहा व उकडलेले शेंगदाणे वाटण्यात आले. याशिवाय विविध संस्था व मंडळांच्या वतीने केळी, उपवासाचे पदार्थ, पाण्याच्या बाटल्या, पाणी पाऊच, दूध, चहा आदींचे लंगर रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
७०० पोती खिचडीसह हजारो भाविकांची सेवा
नेवासानगरीत सुमारे ७०० पोती साबुदाणा खिचडी, एक हजार लिटर दूध, ५० ते ६० कॅरेट केळी, १९ पोती उकडलेले शेंगदाणे, दोन पोती राजगिरा लाडू, शेकडो लिटर चहा आणि शेकडो पाण्याच्या जारचे मोफत वाटप करण्यात आले. त्यामुळे यंदाच्या यात्रेत वारकऱ्यांच्या गर्दीबरोबरच अन्नदानाचाही उच्चांक दिसून आला.
माऊलींबरोबर ग्रामदैवतांच्या मंदिरांतही गर्दी
संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराबरोबरच नेवासाचे ग्रामदैवत श्री मोहिनीराज मंदिर, श्री तुकाराम महाराज मंदिर, विठ्ठल-रुक्माई मंदिर, मारुती मंदिर, दत्त मंदिर आदी मंदिरांमध्येही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे संपूर्ण नेवासानगरी दिवसभर भक्तिरसात न्हाऊन निघाली होती.
प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त
नेवासात दाखल होणाऱ्या लाखो माऊलीभक्तांच्या सेवेसाठी प्रशासनाने विशेष नियोजन केले होते. तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाची यंत्रणा कार्यरत होती. तर पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस व होमगार्ड दलाने शहरातील चौकाचौकात गर्दीचे व्यवस्थापन आणि वाहतूक नियंत्रणासाठी मोठा बंदोबस्त ठेवला होता.
पावसाच्या सरी सुरू असतानाही भक्तीचा ओघ मात्र अखंड सुरूच होता. पावसाला न जुमानता नेवासाकडे येणाऱ्या वारकऱ्यांच्या लाटा आणि माऊलींच्या दर्शनासाठी उसळलेला जनसागर यामुळे कामिका एकादशीला नेवासानगरी अक्षरशः ‘ज्ञानेश्वरमय’ झाली होती.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
light rain
29.6 ° C
29.6 °
29.6 °
70 %
6.1kmh
88 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
30 °
Sat
29 °

Most Popular

error: Content is protected !!