नेवासा प्रतिनिधी :
नेवासा तालुक्यातील मक्तापूर ग्रामपंचायतीसमोर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मराठा सुकाणू समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे यांच्या वतीने विविध प्रलंबित प्रश्नांसाठी एकदिवसीय अन्नत्याग उपोषण करण्यात आले. या उपोषणाची दखल घेत नामदार शंकरराव गडाख व खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी स्वतः फोन करून झगरे यांना उपोषण सोडण्याची विनंती केली तसेच त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्याचे आवाहन केले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा उपप्रमुख रामदासजी गोल्हार, मक्तापूर गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दत्ताभाऊ कांगुणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेवासा तालुकाध्यक्ष मच्छिंद्र म्हसके तसेच ग्रामसेवक दत्तात्रय गर्जे यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांचे लेखी पत्र झगरे यांना दिल्यानंतर त्यांचे उपोषण सोडविण्यात आले.
यावेळी गणेश झगरे यांनी सांगितले की, नेवासा फाटा ते मक्तापूर या रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून मोठमोठे खड्डे पडले असून नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे शौचालय खराब झाले असून त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. गावातील अनेक प्रधानमंत्री आवास, रमाई आवास व शबरी आवास योजनेतील घरकुलांचे पैसे प्रलंबित आहेत.
तसेच जलजीवन मिशनअंतर्गत सुमारे तीन कोटी रुपयांची पाणी योजना असून तिचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित १० टक्के काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, ग्रामपंचायत कार्यालयासाठी पूर्णवेळ प्रशासक नेमण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात आल्याचे झगरे यांनी सांगितले.
या मागण्यांसंदर्भात आपण ३ तारखेला नेवासा तहसीलदार तसेच पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. आता मागण्यांबाबत लेखी पत्र मिळाल्यामुळे उपोषण सोडत असल्याचे झगरे यांनी स्पष्ट केले. तसेच मक्तापूर ग्रामस्थांनी उपोषण सोडण्याची विनंती केली, त्याबद्दल आपण त्यांचे ऋणी असल्याचे सांगत, “मी सर्वसामान्यांसाठी आयुष्यभर झटणारा गोरगरीब कार्यकर्ता आहे. सर्वसामान्य जनता हीच माझी मायबाप आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
मागण्या पूर्ण करण्यासाठी ताकद लावणार : गोल्हार
यावेळी रामदासजी गोल्हार यांनी सांगितले की, महाराष्ट्र सरकारकडे निधी आहे; मात्र पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका झालेल्या नसल्यामुळे ग्रामीण भागात निधी उपलब्ध होण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विकासकामे ठप्प झाली आहेत. गणेश झगरे यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद लावण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
निवडणुकीनंतर सर्व कामे पूर्ण करण्याचे आश्वासन
मक्तापूर तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दत्ताभाऊ कांगुणे यांनी ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर गावातील प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दत्ताभाऊ कांगुणे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासजी गोल्हार, माजी सरपंच बन्यामिन साळवे, पुनमचंद साळवे, विराट प्रतिसादचे सागर सरोदे, टिल्लू गव्हाणे, केकिज केक शॉपचे मालक जोयल साळवे, निवृत्ती सातपुते, अविनाश हिवाळे, योसेफ चव्हाण, माणिकराव साळवे, साहेबराव साळवे, सतीश बर्डे, अविनाश गोरक्षनाथ बर्डे, लहानू नवघरे, आजिनाथ झगरे, प्रदीप बर्डे, विलास साळवे, अनिल हिवाळे, मयूर साळवे, सुनील गोरे, शरणपूर वृद्धाश्रमचे संचालक रावसाहेब मगर, फिलिप साळवे, कचरूभाऊ जामदार, लक्ष्मण तुकाराम बर्डे, हरिभाऊ कोळेकर, मच्छिंद्र जामदार, प्रिन्स दरबारचे संस्थापक अध्यक्ष व पत्रकार बादलभाऊ परदेशी, लोकपरिवर्तनचे संपादक आबासाहेब शिरसाठ, सार्वमतचे पत्रकार बाळासाहेब देवखिळे, वंचित बहुजन आघाडीचे नेवासा तालुका उपाध्यक्ष योगेश गायकवाड, अमोल भागवत, अशोक साळवे, सुनील साळवे, गोरक्षनाथ नवघरे, सनीभाऊ साळवे, रितेश साळवे, जोबदास साळवे, आकाश बनकर, अनिल साळवे, आजिनाथ नानासाहेब जामदार, राहुल जामदार, शिवाजी दशरथ बर्डे आदी मक्तापूर ग्रामस्थ उपस्थित होते.

