नेवासा प्रतिनिधी :
टोका (प्रवरसंगम) येथील घटेश्वर मंदिरालगत असलेल्या पारंपरिक स्मशानभूमीचे ग्रामवर्गणीतून नूतनीकरण करण्यात आले असून, सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे.
नूतनीकरणाच्या कामामध्ये २६×७५ फूट क्षेत्रातील सीसीटीव्ही यंत्रणा, ५०×४० फूट शेड, बसण्यासाठी बाकडे तसेच पेव्हिंग ब्लॉक बसविण्याची कामे करण्यात आली आहेत. स्मशानभूमीतील पेव्हिंग ब्लॉकचे काम माननीय आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आले आहे.

दरम्यान, बी. के. चव्हाण व आशाताई बी. चव्हाण यांनी आपल्या ४४ व्या विवाहदिनानिमित्त आई-वडील स्वर्गीय सौ मनकर्णाबाई व स्वर्गीय खंडोजी काशीराम चव्हाण देवळालीप्रवरा तालुका राहुरी यांच्या व स्व. कौशल्याबाई व स्व. सखाराम रामचंद्र जाधव (खरवंडी, ता. नेवासा) यांच्या स्मरणार्थ ग्रामपंचायत टोका व ग्रामपंचायत प्रवरसंगम यांना अंत्यविधी रथ भेट देण्याचा निर्णय घेतला आहे.
या उपक्रमाचा लोकार्पण सोहळा गुरुवार, दि. ११ जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजता घटेश्वर मंदिरामागील स्मशानभूमी परिसरात आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमासाठी गट शिक्षण अधिकारी डॉक्टर संजय कळमकर यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.
या उपक्रमासाठी बी. के. चव्हाण, उदय डावखर यांच्यासह टोका (प्रवरसंगम) परिसरातील ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. गावकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाल्याने दोन्ही ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, तलाठी स्मशानभूमी समितीचे सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, देणगीदारांचा यथोचित सत्कार करण्यात येणार आहे.
गावाच्या सामाजिक ऐक्याला बळकटी देणारा व ग्रामविकासाला चालना देणारा हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरेल, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

