न्यायालयाचा निर्णय; पुढील सुनावणी ८ मे रोजीच होणार
न

नेवासा : त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलाचे सचिव मनीष घाडगेपाटील आत्महत्या प्रकरणात आरोपींना दोन दिवसाचा जामीन मिळाला असून, नेवासा जिल्हा व सत्र न्यायालयाने सुमती घाडगे यांच्यासह सहाही आरोपींना ८ मेपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
या प्रकरणाची पुढील सुनावणीही आठ मे याच तारखेला होणार असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता न्यायालयीन प्रक्रियेकडे लागले आहे.
मनीष घाडगेपाटील आत्महत्या प्रकरणात संस्थेच्या अध्यक्षांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर आज आरोपींच्या वतीने न्यायालयात अंतरिम जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. यावर सुनावणी घेत नेवासा जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपींना ८ मेपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला.
या प्रकरणात संस्थेच्या अध्यक्षा सुमती साहेबराव घाडगेपाटील, स्नेहल साहेबराव घाडगे, श्रुती साहेबराव घाडगे, चेतन चव्हाण, सोपान बाजीराव काळे आणि अनुराधा उत्तम गोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीष घाडगे यांच्या पत्नी मनीषा घाडगे यांनी मानसिक छळ, खोट्या गुन्ह्यांच्या धमक्या आणि मालमत्ता हस्तांतरणासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत केला आहे.
दरम्यान, आरोपींच्या वतीने अॅड. संजय वाखरे यांनी काम पाहिले, तर फिर्यादी मनीषा घाडगे यांच्या बाजूने अॅड. प्रशांत कोतकर यांनी न्यायालयात बाजू मांडली. या प्रकरणामुळे शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू असून, पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

