50 हजार रुपये किमतीचे गावठी कट्टा जप्त…
नेवासा –कुकाणा परिसरात गावठी कट्टा (पिस्तूल) घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला नेवासा पोलिसांनी अत्यंत शिताफीने सापळा रचून रंगेहात अटक केली आहे. त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला असून, या धडक कारवाईमुळे तालुक्यातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, देवसडे (ता. नेवासा) येथील अविनाश द्वारकानाथ सावंत हा कुकाणा परिसरात बेकायदेशीर गावठी कट्टा घेऊन येणार होता. त्यानुसार नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने कुकाणा येथे सापळा रचला.
संशयित अविनाश सावंत तेथे येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता, त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचा गावठी बनावटीचा कट्टा (पिस्तूल) जप्त करण्यात आला
.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल हरिभाऊ धायतडक यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमाच्या (आर्म्स ॲक्ट) कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, श्री. वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सागर ढिकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल शहाजी आंधळे, पोलीस कॉन्स्टेबल आप्पासाहेब वैद्य, हरिभाऊ धायतडक आणि अमोल डमाळे यांच्या पथकाने केली
. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शहाजी आंधळे करीत आहेत.

