spot_img
spot_img
Homeअध्यात्मिकशासनमान्यते नंतर मोठ्या उत्साहात दुसऱ्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याला सुरुवात!

शासनमान्यते नंतर मोठ्या उत्साहात दुसऱ्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याला सुरुवात!

32 दिंड्यांसह ज्ञानेश्वरी निघाली पंढरीला

नेवासे पुण्यनगरीत पहिला रिंगण सोहळा उत्साहात

नेवासा (प्रतिनिधी): संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचनास्थान असलेल्या श्रीक्षेत्र नेवासा येथून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पायी पालखी दिंडीचे बुधवारी (दि. ८ जुलै) दुपारी पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. शासनाची अधिकृत मान्यता मिळाल्यानंतरचा हा पहिलाच पालखी सोहळा असल्याने यंदाचा सोहळा विशेष भव्य आणि दिव्य वातावरणात पार पडला. सुमारे तीस दिंड्यांसह हजारो वारकरी “ज्ञानोबा माऊली तुकाराम”च्या अखंड नामघोषात सहभागी झाले. नेवासे एसटी स्थानक परिसरात पालखी सोहळ्यातील पहिला रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात रंगला.

माऊलींच्या पादुकांचे व पैस खांबाचे पूजन भास्करगिरीजी महाराज, उद्धवजी महाराज, ज्ञानेश्वर माऊली कदम, देविदास महाराज म्हस्के, रमेशानंदगिरीजी महाराज, ऋषिनाथजी महाराज, ज्ञानेश्वरजी महाराज आणि यांच्या हस्ते मंत्रांच्या जयघोषात करण्यात आले.

ज्ञानेश्वर महाराज मंदिरातून पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला. पालखीच्या रथाचे मानाची बैल व मानाचे आश्वाचे देखील पूजन करण्यात आले यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील, रत्नमालाताई लंघे-पाटील, देवस्थानचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, माजी आमदार नरेंद्र घुले-पाटील, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, शंकरराव लोखंडे, शिवसेनेचे युवा नेते प्रभाकरराव शिंदे, उदयनदादा गडाख-पाटील, नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, डॉ. क्षितिज घुले, नंदकुमार पाटील, अॅड. संजय सुखदान व मान्यवरांच्या हस्ते पालखी रथातील पादुकांचे पूजन करण्यात आले.

दिंडीच्या अग्रभागी भागवत धर्माची पताका, त्यामागे डोक्यावर तुळशी कलश घेतलेल्या महिला, भजनी मंडळे, टाळ-मृदुंगाच्या गजरात चालणारे वारकरी आणि पुष्पांनी सजविलेल्या चांदीच्या रथात माऊलींच्या पादुका असे दिमाखदार स्वरूप होते. रथाचे पुढे मानाच्या दोन दिंड्या होत्या इतर दिंड्या शिस्तीत पालखीच्या मागे चालल्या दिंडीने नेवासे शहराला प्रदक्षिणा घातली.

शहरातील विविध चौकांत फटाक्यांची आतषबाजी, तोफांची सलामी, रांगोळ्या आणि पुष्पवृष्टी करून पालखीचे स्वागत करण्यात आले. प्रदक्षिणामार्ग नंदकुमार खरात महाराज उद्धव महाराज नेवासकर अंकुश महाराज जगताप यांनी पालखीचे स्वागत केले नगरपंचायत चौकात स्वर्गीय राजेंद्र मापारी मित्र मंडळाच्या वतीने जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली, तर नगरसेवक स्वप्नील मापारी यांनी संतांचा सत्कार केला. महाराष्ट्र बँक चौकात मुथा मेडिकलचे मुथा कुटुंबाकडून फराळाची वाटप करण्यात आले

नेवासा एसटी स्थानक परिसरात राज्यातील दुसरा आणि या पालखी सोहळ्यातील पहिला रिंगण सोहळा भक्तिभावात पार पडला. अश्व रिंगण, झेंडा रिंगण, टाळ-मृदुंग रिंगण तसेच महिला भजनी मंडळांचे रिंगण “ज्ञानोबा माऊली तुकाराम”च्या जयघोषात रंगले. नेवासा आगाराच्या वतीने आगार व्यवस्थापक प्रशांत होले तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पालखीचे पूजन केले.

या ठिकाणी नेवासा प्रेस क्लब आणि पत्रकारांच्या वतीनेही पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले व देविदास महाराज म्हस्के यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी भगवान शास्त्री जंगले, नंदकिशोर महाराज खरात, कृष्णा हारदे, ज्ञानेश्वर माऊली शिंदे, ज्ञानेश्वर महाराज हजारे, लक्ष्मीनारायण जोंधळे,  राम महाराज भोगे यांच्यासह वारकरी संप्रदायातील महाराज, हजारो वारकरी, महिला-पुरुष भाविक आणि नेवासेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट

नेवासा पोलीस निरीक्षक दराडे यांच्या संकल्पनेतून व प्रसिद्ध चित्रकार भरत कुमार उदावंत आणि सत्यजित व उदावंत यांच्या कारिकरीतून याच दिंडीमध्ये व्यसनमुक्तीची दिंडी देखील निघाली चित्रकार उदास यांनी रेखाटलेल्या व्यसन मुक्तीसाठीचे विविध घोषवाक्य असलेले फलक या दिंडीमध्ये सर्वांनी अडकवले विशेष म्हणजे आमदार लंगे पोलीस निरीक्षक दराडे दिंडीतील सर्वच महाराज मंडळी व महिला मंडळांनी देखील सदरचे फलक हातात घेऊन व्यसनमुक्तीचा प्रचार केला

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
light rain
29.6 ° C
29.6 °
29.6 °
70 %
6.1kmh
88 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
30 °
Sat
29 °

Most Popular

error: Content is protected !!